लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासन व प्रशासन दोघेही हादरले असून, ही परिस्थती नियंत्रणात आणण्यासाठी दोघेही आता ॲक्शन मोडवर आले आहेत. खुद्द पालकमंत्र्यांनीच आता नागरिकांना नियमाचे पालन करण्याचे आवाहन करीत जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा दिला आहे.
पत्रपरिषदेत बोलताना पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले, कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. देशात विदर्भात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यात विशेषत: नागपूर आघाडीवर आहे. याचे कारण म्हणजे नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करताना दिसून येत नाही. जसे मास्क न वापरणे, निष्काळजीपणा बाळगणे, बाजारात गर्दी करणे आदींचा यात समावेश आहे. अनेक जण लस आली आहे, आता लसीने कोरोना होणार नाही, अशा आविर्भावात आहेत. परंतु या आविर्भावात राहू नका, कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करा. शासन-प्रशासनावर जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ देऊ नका.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण यापूर्वीच प्रशासनाला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे, चाचण्यात वाढ करणे आदींबाबतचे हाय अलर्टचे निर्देश दिले आहेत. या महामारीत आता ३० ते ४० वयोगटामधील रुग्णांचे मृत्यू होत असल्याचे आढळून येत असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले. नागरिकांनीही आता काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, वारंवार हात धुवावे असे आवाहनही राऊत यांनी यावेळी केले.
बॉक्स....
घरूनच सुरुवात
यावेळी राऊत म्हणाले, मी पालकमंत्री असलो तरी नागपूरचा नागरिक आहे. त्यामुळे हे सर्व नियम मलाही लागू होतात. याची सुरुवात मी माझ्या घरूनच केली आहे. माझ्या मुलाचे लग्न आहे. हे लग्नही कोरोनाच्या नियमाच्या अधीन राहून केले जाईल. लग्नासाठी पाच कार्यक्रम ठेवले होते, ते रद्द केल्याचेही राऊत यांनी यावेळी सांगितले. लग्नात कुणालाही बोलावता येत नसल्याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.