नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयावह वास्तव समोर आणले असले तरी यातून धडा घेण्यास कुणी तयार नाही. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताच नागपूरकरांना कोरोना नियमाचा विसरच पडल्याचे दिसून येत आहे. विशेषत: सायंकाळ होताच कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे शहरातील बहुतांश चौकातील चित्र आहे. यामुळे रात्री कोरोना होत नाही का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोरोना विषाणूला दूर ठेवण्यासाठी तोंडाला मास्क बांधणे, सातत्याने हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे याची जनजागृती मागील दीड वर्षांपासून सर्वच स्तरावर केली जात आहे. परंतु कोरोनाचा जोर कमी होताच त्याची भीतीही कमी झाली आहे. दिवसा कारवाईच्या भीतीने अनेक जण तोंडाला मास्क बांधताना दिसून येतात. परंतु रात्री महापालिकेच्या पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने अनेक जण बिनधास्त होतात. विशेषत: चौकाचौकात तरुणवर्ग विनामास्क दिसून येतात. मंगळवारी रात्री व्हेरायटी चौक, झाशी राणी चौक, लोकमत चौक, प्रतापनगर चौक, मेडिकल चौक, भगवाननगर चौक, इंदोरा चौक, स्वावलंबीनगर चौक, सदर चौक या भागात फेरफटका मारला असता प्रत्येक चौकात दहापैकी आठ विनामास्कचे तर दोघांच्या हनुवटीला मास्क लटकत असल्याचे दिसून आले.
- डेल्टा प्लसचा धोका
महाराष्ट्रामध्ये कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येताच आता डेल्टा प्लस कोरोनाचे संकट आ वासून उभे राहिले आहे. देशातील निम्म्यापेक्षा जास्त डेल्टा प्लस रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात असल्याचे केंद्र सरकारने जारी केलेल्या आकड्यातून समोर आले आहे. राज्यात आतापर्यंत ४५ डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाली आहे. हा व्हेरियंट अधिक संसर्गजन्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने चिंता वाढली आहे.
-मास्क न वापरणाऱ्यांवर रात्री कारवाई नाही
महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी आतापर्यंत मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ३९ हजार ६०४ नागरिकांविरुद्ध कारवाई केली आहे. ५०० रुपये याप्रमाणे १ कोटी ८१ लाख ६१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. परंतु ही कारवाई दिवसा होते. रात्री कारवाई होत नसल्याने अनेक जण विना स्क फिरताना दिसून येतात. आता तर निर्बंध शिथिल करण्यात आल्याने धोका वाढला आहे.
-पोलिसांचाही मास्क तोंडाखाली
सामान्यांसोबतच पोलिसांमध्येही आता मास्कविषयी गंभीरता कमी झाल्याचे दिसून येत आहे. चौकाचौकात उभे राहणारे पोलीस असो किंवा सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस असो अनेकांच्या तोंडाखालीच मास्क राहतो. विशेष म्हणजे, अनेक पोलीस ‘एन-९५’ किंवा ‘ट्रिपल लेव्हल मास्क’चा वापर न करता साधा कापडाचा मास्क घालताना दिसून येतात.
-लसीकरणाची गती वाढेना (ग्राफिक्स)
वयोगट :पहिला डोस: दुसरा डोस
१८ ते ४४:४२३९५० : ३५८०२
४५ ते ५९:२०३७७४ : १५६७५५
६० पेक्षा जास्त: २०३७६०:१३४०४५