नागपूर : एक झाड ताेडून दुसरे लावण्याच्या गाेष्टी केल्या जातात. एखादे माेठे झाड मार्क करून तेवढेच ताेडू असे सांगून फसवणूक केली जाते. मात्र त्या एका झाडाच्या आसपास अनेक प्रजातीचे वृक्ष ताेडले जातील, हे सांगितले जात नाही. अजनीमध्ये एक झाड नाही, हजाराे आहेत. हे वन नष्ट केल्यानंतर ताेडणाऱ्यांची दुसरे अजनीवन निर्माण करण्याची कुवत आहे का, असा थेट सवाल पर्यावरण प्रेमींनी विचारला आहे.
अजनी वाचवा माेहिमेंतर्गत रविवारी अजनी रेल्वे परिसरात ट्री-वाॅक आणि स्वच्छता अभियान राबवून इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्पासाठी हाेणाऱ्या वृक्षताेडीचा निषेध करण्यात आला. नागपूर प्लाॅगर्सच्या टीमने परिसरात स्वच्छता अभियान राबवून १० बॅग प्लास्टिक कचरा गाेळा केला. यानंतर पर्यावरण कार्यकर्ता जुई पांढरीपांडे यांनी प्लास्टिक बाॅटल्सपासून इकाेब्रिक्स बनविण्याचे तंत्राबद्दल प्रात्याक्षिक दाखविले. संदीप पथे यांनी अजनी परिसरातील ऐतिहासिक वारसा गाेष्टींचे विस्तृतपणे मार्गदर्शन केले. जाेसेफ जाॅर्ज, अनसूया काळे-छाबरानी, कुणाल माैर्य, राेहन अरसपुरे, ब्लाॅगर शशांक गट्टेवार, आर जे राज, अनित काेल्हे, बीएनआयचे प्रमुख प्रमाेद बत्रा, मेहुज सुखाडिया, पं. ज्वालाप्रसाद, वासुदेव मिश्रा तसेच पर्सिस्टंट फाऊंडेशनचे पर्यावरण कार्यकर्ते सहभागी हाेते.
ब्लाॅगर्स व संघटना वाढल्या
या आंदाेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे सातत्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध संघटना, पर्यावरण कार्यकर्ते अभियानाशी जुळत आहेत. टुगेदर वुई कॅन, स्वच्छ फाऊंडेशन व नागपूर सिटीझन फाेरमने अभियान पुढे रेटले आहे. रविवारी दि ड्रीम फाॅर लाईफ फाऊंडेशन, मॅट्रिक्स वाॅरियर, पर्यावरण नीतीमूल्य, सखा, मुद्राज, बेटिया शक्ती फाऊंडेशन, सिलीग्राम अशा संस्थांचे कार्यकर्ते माेठ्या संख्येने सहभागी झाले. याशिवाय साेशल मीडियावर सक्रिय दि देसी स्ट्रीट, नागपूर डाॅट वाला, दि क्रेव्हींग टेल्स, ट्विंकल फाऊंडेशन, फूड लेगेसी, नागपूर्स क्लब आदी ब्लाॅगर्स या माेहिमेत सहभागी झाले.
एकाच ओळीत ५० प्रजाती
ट्रि वाॅक सेशनमध्ये वनस्पतीतज्ज्ञ डाॅ. प्राची माहुरकर यांच्या नेतृत्वात येथील झाडांच्या अभ्यासासाठी वाॅक करण्यात आला. डाॅ. माहुरकर यांनी या परिसरात असलेल्या विविध झाडांच्या प्रजाती, त्यावर राहणारे पक्षी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. काॅलनीच्या केवळ एकाच ओळीमध्ये ५० प्रजातीचे शेकडाे वृक्ष आढळले आहेत. त्यात शंभरपेक्षा जास्त वर्ष जुनी झाडे, फुलझाडे, औषधी वनस्पतींचा समावेश आहे. संपूर्ण काॅलनी हा आकडा किती माेठा असेल. त्यांनी पक्ष्यांबाबतही मार्गदर्शन केले.