केंद्रीय कृषिमंत्र्यांना शेतकऱ्याने सुनावले : उपस्थित शेतकऱ्यांचा टाळ्यांचा प्रतिसादलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांना नागपुरात आयोजित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात शेतकऱ्याच्या रोषाला सामोरे जावे लागले. सिंग यांचे भाषण सुरू असताना गर्दीतील एका शेतकऱ्याने उभे राहून तुमचे भाषण बंद करा, आधी आमच्या दुधाला ४० रुपये लिटर भाव द्या व सातबारा कोरा करा, असे सुनावले. सिंह यांनी मात्र त्या शेतकऱ्याची साधी दखलही घेतली नाही. मात्र, उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्या शेतकऱ्याच्या मागणीला पाठिंबा दिला.नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड व मदर डेअरी यांच्या संयुक्त विद्यामाने नागपुरातील देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांच्या हस्ते डेअरी संयंत्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. सभागृह शेतकऱ्यांची खचाखच भरले होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. यावेळी राधा मोहन सिंह यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काय काय केले याचा पाढा वाचणे सुरू केले. त्यांचे भाषण सुरू असताना सभागृहात एक शेतकरी उभा झाला. आम्हाला तुमचे भाषण नको, दुधाला ४० रुपये लिटरचा भाव जाहीर करा, आमचा सातबारा कोरा करण्याची घोषणा करा, अशी मागणी केली. मात्र, त्याच्या मागणीकडे लक्ष न देता केंद्रीय कृषिमंत्र्यांनी आपले भाषण सुरूच ठेवले.त्या शेतकऱ्यानेही माघार घेतली नाही. शेतकऱ्याने आणखी जोरात मागणी रेटून धरली. सुमारे तीन ते चार मिनिट मंचावरून केंद्रीय कृषिमंत्री तर सभागृहात संबंधित शेतकरी अशी दोन भाषणे सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले होते. शेवटी दोन पोलीस शेतकऱ्याला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या जवळपास आले. पण तसे केले तर आणखी गोंधळ वाढेल म्हणून ते माघारी फिरले. शेतकऱ्याचा आवाज सुरूच होता. त्याच्या मागणीला उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करीत पाठिंबा दिला. शेवटी नितीन गडकरी यांनी संबंधित शेतकऱ्याला इशारा केला व राधा मोहन सिंह यांचे भाषण संपता संपता तो शेतकरी जागेवर बसला. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी आपले भाषण संपविताना ‘असे काही अपवाद वगळले तर उर्वरित शेतकऱ्यांना भेटण्याचे सौभाग्य आपल्याला लाभले’, असे वक्तव्य करीत अप्रत्यक्षपणे त्या शेतकऱ्यावर टीका केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण मात्र शेतकऱ्यांनी शांतपणे ऐकून घेतले. शेतकरी संपावर राधा मोहन सिंह यांचे मौन राज्यात विविध मागण्यांसाठी शेतकरी संप सुरू आहे. केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह शनिवारी रात्रीच नागपुरात आले. रविवारी सायंकाळी ५ पर्यंत ते नागपुरात होते. या दरम्यान प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी वारंवार संपर्क केल्यानंतरही सिंग यांनी संपावर एक शब्दही बोलणे टाळणे. कार्यक्रमातही त्यांनी शेतकरी संपाचा साधा उल्लेखही केला नाही.
भाषण नको, आधी सातबारा कोरा करा
By admin | Updated: June 5, 2017 01:46 IST