हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पत्नीचे पतीवर धक्कादायक आरोपराकेश घानोडे नागपूरविवाहबंधन भावनिकदृष्ट्या तुटले तरी या आधारावर पती-पत्नीपैकी कोणालाही घटस्फोट मंजूर केला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला आहे.याप्रकरणातील पत्नीने घटस्फोट मिळण्यासाठी पतीविरुद्ध अतिशय अविवेकी, खोटे व धक्कादायक आरोप केले होते. सर्वप्रकारच्या वाईट गोष्टी केवळ तिच्याच पतीमध्ये असल्याचे संबंधित आरोपांवरून वाटत होते. परंतु तिला पतीविरुद्धचा एकही आरोप सिद्ध करता आला नाही. परिणामी ती घटस्फोट मिळण्यासाठी अपात्र ठरली. असे असले तरी मानहानीजनक आरोपांमुळे त्यांचे विवाहबंधन भावनिकदृष्ट्या जवळपास संपुष्टात आले आहे. भविष्यात पती-पत्नी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता संपली आहे. या आधारावर पत्नीला घटस्फोट मंजूर करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अनंत बदर यांनी ही विनंती फेटाळून लावली. पती-पत्नीपैकी कोणालाही स्वत:च्या चुकीचा लाभ घेण्याची परवानगी देऊ शकत नाही. विवाहबंधन कधीही न जुळण्यासाठी तुटले असले तरी प्रकरणातील पत्नीला घटस्फोट देता येणार नाही, असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले आहे. माधुरी व महेश यांचा (काल्पनिक नावे) २७ नोव्हेंबर २००१ रोजी रांची येथे प्रेमविवाह झाला. २००९ पर्यंत दोघेही आनंदात राहिले. यानंतर माधुरीने घटस्फोट मिळविण्यासाठी महेशवर विविध धक्कादायक आरोप करून नागपूर कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. सासरा व दीर लग्नानंतर एक वर्षातच मानसिक त्रास द्यायला लागले. महेश नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणण्यास सांगत होता. महेशला मद्याचे व्यसन आहे. तो रोज रात्री हातबुक्की व काठीने मारहाण करीत होता. महेश गुन्हेगारी वृत्तीचा असून खंडणी वसुली व दरोडे टाकण्याची कामे करतो. खंडणी वसुलीसाठी त्याला सहा महिन्यांचा कारावास झाला आहे. महेशच्या भावाने अनेकवेळा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महेश मानसिकदृष्ट्या आजारी असून शेजाऱ्यांना विनाकारण शिवीगाळ व मारहाण करतो. रात्री उठून रडायला लागतो. त्याचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत, असे आरोप माधुरीने केले होते. २९ आॅक्टोबर २०१२ रोजी कौटुंबिक न्यायालयाने माधुरीची याचिका फेटाळून लावली होती. याविरुद्ध तिने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयानेही माधुरीचे आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवून अपील खारीज केले.(प्रतिनिधी)
भावनिकदृष्ट्या विवाहबंधन तुटले म्हणून घटस्फोट नाही!
By admin | Updated: August 3, 2015 02:48 IST