जिल्हा परिषद निवडणूक; बावनकुळे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 01:39 PM2020-01-07T13:39:48+5:302020-01-07T13:41:40+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सुरू झालेल्या मतदानात माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.

District Council Elections; Bawankule voted with his family | जिल्हा परिषद निवडणूक; बावनकुळे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

जिल्हा परिषद निवडणूक; बावनकुळे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सुरू झालेल्या मतदानात माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.
कोराडी ग्रामपंचायत येथे त्यांनी मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ. ज्योतीताई बावनकुळे, मुलगा संकेत व कन्या पायल आष्टानकर होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात ही निवडणूक होत असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपचा प्रभाव कमी करण्यासाठी तीन मंत्र्यांना हा भार सोपविला आहे. त्यामुळे ही निवडणूक नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई ठरत आहे. जिल्हा परिषदेच्या ५८ सर्कलसाठी २७० तर पंचायत समितीच्या ११६ गणासाठी ४९७ उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षासह गोंडवाना गणतंत्र पाटील, प्रहार, बहुजन वंचित विकास आघाडी या पक्षाचेही उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे १३ उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच २४७ झोन अधिकारी यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय एकूणच निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे ८,५०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात १४,१९,७७० मतदार आहेत. यापैकी ७,३६,६४३ पुरुष व ६,८३,०५४ महिला मतदार आहेत. सोमवारी दुपारपर्यंत सर्व पोलीस पार्टी मतदान केंद्रावर रवाना झाल्या होत्या.
१८२८ मतदान केंद्रांवर मतदान
जि. प. ५८ गट व पं. स. ११६ गणासाठी १८२८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यापैकी १८२ मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्रे म्हणून सजविण्यात येणार आहेत. यापैकी २७ मतदान केंद्रे संवेदनशिल आहेत.

दोन बटन दाबल्यानंतर वाजणार बीब
या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या मशिनीवर होणार असल्याने त्यात केवळ मेमरी चिप आहे. त्यामुळे या निवडणुका ‘व्हीव्हीपॅट’विनाच होणार आहेत. एकाच ईव्हीएमवर जि.प. व पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे. मतदाराला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवाराला मतदान करायचे आहे. त्यामुळे दोन बटन दाबल्यानंतरच बीब वाजणार आहे.

नागपूर ग्रामीणमध्ये सर्वाधिक मतदार
नागपूर ग्रामीण तालुक्यात सर्वाधिक २३३ मतदान केंद्र व सर्वाधिक १,९८, ८८५ मतदार आहेत.
भिवापूर तालुक्यात सगळ्यात कमी ८६ मतदान केंद्र व सर्वात कमी ५७,११८ मतदार आहेत.

पोलिसही सज्ज
या निवडणुकीसाठी तब्बल चार हजार पोलिसांचा ताफा जिल्ह्यात व शहरात तैनात करण्यात आला. ग्रामीण भागातील १६ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. बंदोबस्तात ग्रामीण पोलिसांकडून एक अधीक्षक, एक अतिरिक्त अधीक्षक, सहा पोलीस उपअधीक्षक, २८ पोलीस निरीक्षक, ११७ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, १७८८ पोलीस कर्मचारी, १४०० होमगार्ड व राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी नागपूर जिल्ह्यात तैनात करण्यात आली आहे.

Web Title: District Council Elections; Bawankule voted with his family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.