रिझर्व्ह बँकेच्या नियमांची पूर्तता : सीआरएआर ९ टक्के नागपूर : सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाअखेर नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २६.७२ कोटी रुपयांचा चलित नफा मिळवून ९ टक्के सीआरएआर राखलेला असून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अटींची पूर्तता केली आहे. त्यामुळे बँकेला मागील वर्षी प्राप्त झालेला बँकिंग परवाना पुढेही कायम राहण्यास अडचण नाही. यासोबतच बँक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे वीज बिल स्वीकारण्याचे काम १० एप्रिलपासून सुरू करणार आहे. सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रूपे केसीसी के्रडिट कार्डच्या माध्यमातून खरीप पीक कर्जवाटपास सुरुवात केली आहे. आतापर्यंत २२०० शेतकरी सभासदांना १६ कोटींचा कर्ज पुरवठा केला आहे. लवकरच बँकेमार्फत क्लिअरिंग होऊन आरटीजीएस व एनईएफटीची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच बँकेमार्फत सुवर्णतारण, स्थायी मालमत्तेचे तारण तसेच पगारदार कर्मचाऱ्यांना घरबांधणी व घर खरेदी कर्ज, वाहन कर्ज, कन्झुमर ड्युरेबल इत्यादी स्वरूपाच्या कारणासाठी वैयक्तिक कर्जपुरवठासुद्धा सुरू करण्यात आला आहे. बँकेचे खातेदार व ठेवीदार आणि हितचिंतक यांनी बँकेच्या यशस्वी वाटचालीमध्ये मोलाचे सहकार्य केल्यामुळे जिल्हाधिकारी आणि बँकेचे मुख्य प्राधिकृत अधिकारी यांनी बँकेतर्फे आभार व्यक्त केले आहे. बँकेने उपलब्ध करून दिलेल्या सोयी सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा बँकेचा परवाना कायम राहणार
By admin | Updated: April 9, 2017 02:27 IST