नागपूर : केंद्रीय विद्युत मंत्रालय, राज्य शासन, एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) आणि महावितरणच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या डोमेस्टिक लाईटिंग प्रोग्राम अंतर्गंत नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ७१ हजार एलईडी बल्बचे वाटप करण्यात आले आहे. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मागील २९ आॅगस्ट २०१५ रोजी या योजनेचा नागपुरात शुभारंभ करण्यात आला होता. यानंतर अवघ्या काही दिवसांत जिल्ह्यातील एक लाखांवर वीज ग्राहकांनी या योजनेत सहभागी होत ४ लाख ७१ हजारापेक्षा अधिक एलईडी बल्ब स्वीकृत करीत आघाडी घेतली. या योजनेची सुरुवात सर्वप्रथम मुंबई व त्यानंतर ठाणे, भिवंडी, वाशी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि त्यानंतर नागपुरात करण्यात आली. अशाप्रकारे संपूर्ण राज्यात आतापर्यंत एकूण १८ लाख ९९ हजारापेक्षा अधिक बल्ब वितरित करण्यात आले आहे. पण यात नागपूर जिल्ह्यातील सर्वांधिक म्हणजे ४ लाख ७१ हजार बल्बचा समावेश आहे. यानंतर ठाणे जिल्ह्यात ४ लाख ५६ हजार, रत्नागिरी ३ लाख ९५ हजार, सिंधुदुर्ग ३ लाख ३७ हजार, वाशी ८४ हजार, वर्धा ८७ हजार, मुंबई ३३ हजार व भिवंडी येथे ३२ हजार बल्बचे वाटप झाले आहे. विशेष म्हणजे, एलईडी बल्बच्या वापराने केवळ वीज बिलच नव्हे, तर विजेचा वापर कमी होणार असून कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणात मोठी घट होत प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात या योजनेची यश्स्वी घोडदौड सुरू आहे. ७ वॉटचा एलईडी बल्ब हा ६० वॉटच्या सामान्य बल्ब एवढा प्रकाश देतो. म्हणजेच एलईडी बल्बने ८० टक्क्यांपर्यंत विजेची बचत होते. या योजनेत ४०० रुपयांचा एलईडी बल्ब ग्राहकांना केवळ १०० रुपयांत उपलब्ध करू न दिला जात आहे. (प्रतिनिधी)३६ लाख बल्ब वाटपाचे उद्दिष्टया योजनेत नागपूर शहरातील महावितरणचे १ लाख ६९ लाख ग्राहक, एसएनडीएलचे ४ लाख २८ हजार ग्राहक व ग्रामीण भागातील ३ लाख २७ हजार अशा एकूण ९ लाख २४ हजार घरगुती वीज ग्राहकांना प्रत्येकी चार याप्रमाणे ३६ लाखांवर एलईडी बल्ब वितरित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
जिल्ह्यात ४ लाख ७१ हजार एलईडी बल्बचे वाटप
By admin | Updated: October 9, 2015 03:06 IST