डॉ. आंबेडकर अध्यासन : परिसंवादात वक्त्यांचा सूरनागपूर : जगभरातील शोषित, वंचितांची ऊर्जाभूमी व प्रेरणाभूमी म्हणून दीक्षाभूमीची ओळख आहे. आज दीक्षाभूमी उभी आहे ती केवळ अॅड. हरीदासबाबू आवळे यांच्यामुळेच. दीक्षाभूमी ही खऱ्या अर्थाने आवळेबाबूंच्या परिश्रमाचे फलित आहे, असा सूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे आयोजित विशेष परिसंवादातील वक्त्यांनी काढला. कर्मवीर अॅड. हरीदास बाबू आवळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे रामदासपेठ येथील डॉ. आंबेडकर विचारधारा विभागात शनिवारी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत कर्मवीर अॅड. हरिदास बाबू आवळे यांचे योगदान’ या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम प्रमुख अतिथी होते, तर भालचंद्र लोखंडे, कर्मवीर आवळे बाबू विचार प्रबोधन मंचचे अध्यक्ष विनायक जामगडे आणि डॉ. चंद्रशेखर पाटील हे वक्ते होते. पूरणचंद्र मेश्राम म्हणाले,दीक्षाभूमीसाठी आवळेबाबू यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच आज दीक्षाभूमी उभी राहू शकली. आंबेडकरी चळवळीतील नायकांचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा नायकांवर संशोधन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. विजय जामगडे म्हणाले, ज्यावेळी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा आवळेबाबू मध्यप्रांतातील अतिशय दुर्गम भागात चळवळीचे काम करीत होते. त्यांच्यापर्यंत उशिरा माहिती मिळाली. कुठलेही साधन नसल्याने त्यांना परिनिर्वाणाला उपस्थित राहता आले नाही, परंतु त्याचा बाऊ करण्यात आला. मात्र ते डगमगले नाही. शेवटपर्यंत चळवळीचेच कार्य करीत राहिले. डॉ. पाटील व भालचंद्र लोखंडे यांनीही आवळे बाबू यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. योगानंद बलरामजी टेंभुर्णे यांनी आवळेबाबू यांच्यावर कविता सादर केली. डॉ. रमेश शंभरकर यांनी प्रास्ताविक व संचालन केले. प्रा. शैलेंद्र धोंगडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)चळवळीतील शिलेदारांच्या कार्यातून तरुणांना मिळेल ऊर्जा आंबेडकरी चळवळ सध्या संक्रमणावस्थेत आहे. तिला ऊर्जा प्राप्त करून देण्याची गरज आहे. यासाठी साहित्य, सभा व विविध माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि चळवळीतील शिलेदारांच्या कार्याची माहिती पोहोचवण्याची गरज आहे. या शिलेदारांच्या कार्यातून तरुण पिढीला ऊर्जा मिळेल, आणि त्यातून चळवळ पुन्हा नव्या जोमाने गतिमान होईल, अशी अपेक्षा डॉ. प्रदीप आगलावे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केली.
दीक्षाभूमी ही आवळेबाबूंच्या परिश्रमाचे फलित
By admin | Updated: June 19, 2016 02:53 IST