सिमेंट रोडचा प्रशासन व सुरक्षा यंत्रणेला अडथळा : संथ कामाचा परिणाम नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ एप्रिलला दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. परंतु दीक्षाभूमीलगतच्या अण्णाभाऊ साठे चौक ते लक्ष्मीभवन चौकदरम्यान सिमेंट रोडचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गाकडून दीक्षाभूमीत प्रवेश करता येणार नाही. यामुळे मोदी यांना दीक्षाभूमीवर येण्यासाठी मुख्य गेट किंवा मागील बाजूचे गेट अशा दोनच दिशा आहेत. पंतप्रधानांचा दौरा विचारात घेता जिल्हा प्रशासन, महापालिका व सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. मोदी यांच्या आगमनापूर्वी दीक्षाभूमी परिसरात सुरक्षा जवान तैनात करण्यात येतील तसेच परिसरातील रस्ते व चौकात वाहतूक पोलीस तैनात करण्यात येतील. परंतु दीक्षाभूमी परिसरात सिमेंट रोडची कामे सुरू असल्याने प्रशासन व सुरक्षा यंत्रणेच्या क ामात अडथळा येणार आहे. दक्षिण-पश्चिम नागपुरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रोडची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. परंतु गेल्या सहा महिन्यापूर्वी सुरू करण्यात आलेली कामे अजूनही अर्धवट अवस्थेत आहेत. रहाटे कॉलनी टी-पॉर्इंट ते माटे चौक यादरम्यान सिमेंट रोड प्रस्तावित आहे. यातील अण्णाभाऊ साठे चौक ते लक्ष्मीभवन चौक या दीक्षाभूमीलगतच्या रोडच्या एका बाजुचे सिमेंटीकरण सुरू आहे. मागील काही महिन्यांपासून हे काम सुरू आहे. परंतु काम कासवगतीने सुरू असल्याने अद्याप पूर्ण झालेले नाही. (प्रतिनिधी) नीरीलगतच्या मार्गावरही कोंडी ४राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था(नीरी)लगतच्या वर्धा मार्गावरील राजीव गांधी चौक ते पोलीस प्रशिक्षण केंद्र या दरम्यानच्या रोडचे सिमेंटीकरण सुरू आहे. रोडच्या एका बाजूचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. दुसऱ्या बाजूच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. सध्या रोडचे काम ठप्पच आहे. या मार्गावर एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. रहदारी सुरू असल्लेल्या बाजूने रोडवर खड्डे असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना जीव मुठीत धरूनच वाहने चालवावी लागतात. काम ठप्पच असल्याने दुसऱ्या बाजूचे सिमेंटीकरण या उन्हाळ्यात होण्याची शक्यता दिसत नाही. दुसऱ्याही मार्गाचे काम अर्धवट दीक्षाभूमी लगतच्या अण्णाभाऊ साठे चौक ते राजीव गांधी चौक ते पोलीस प्रशिक्षण केंद्र या मार्गाला जोडणाऱ्या नीरीच्या मागील बाजूच्या रोडच्या कामाला गेल्या काही महिन्यापूर्वी सुरूवात करण्यात आली होती. रोडच्या एका बाजूचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे रोडच्या दुसऱ्या बाजूचे सिमेंटीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. रोडच्या एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने वाहनांची कोंडी होते. निवडणुकीपूर्वी या कामाला धडाक्यात सुरुवात झाली होती. परंतु गेल्या काही महिन्यात कामाची गती मंदावली आहे. फूटपाथ हरवले राजीव गांधी चौक ते पोलीस प्रशिक्षण केंद्र या रोडचे एका बाजूचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. परंतु सिमेंटीकरण करताना फूटपाथचा विचार करण्यात आलेला नाही. फूटपाथसाठी ३ ते ४ फूट जागा सोडण्यात आली आहे. फूटपाथवर विद्युत पोल आहेत. तसेच ठिकठिकाणी फूटपाथ अरुंद असल्याने यावरुन पादचाऱ्यांना चालता येत नाही. सिमेंटरोडच्या कामात फूटपाथ हरवले. असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. सिमेंट रोडचे काम करताना फूटपाथचा विचार केलेला दिसत नाही. पावसाचे पाणी कुठे जाणार राजीव गांधी चौक ते पोलीस प्रशिक्षण केंद्र तसेच अण्णाभाऊ साठे चौकाकडे जाणाऱ्या रोडचे एका बाजूचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. मात्र सिमेंट रोडचे काम करण्यापूर्वी पावसाळी नाल्याची सफाई करण्यात आलेली नाही. तसेच रोडवरील पाणी नालीत जाण्यासाठी ठिकठिकाणी नालीला चेंबर ठेवण्याची गरज आहे. याकडे लक्ष न दिल्यास पावसाचे पाणी तुंबण्याची शक्यता आहे. साहित्य रोडवर पडून सिमेंटीकरण करण्यात आलेली रोडवर ठिकठिकाणी बांधकाम साहित्य पडून आहे. रोडवरील साहित्य हटवून शिल्लक कामे तातडीने पूर्ण केल्यास रोडचा हा भाग रहदारीसाठी खुला होऊ शकतो. परंतु महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येते.
दीक्षाभूमी : मोदींसाठी दोन दिशा
By admin | Updated: April 6, 2017 02:32 IST