मंगळवारी झोन : समाधान शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहननागपूर : विविध विभागाकडे प्रलंबित असलेले प्रश्न तसेच संजय गांधी निराधार योजनेसह आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, आखीव पत्रिका आदी प्रमाणपत्र जनतेला मुख्यमंत्री समाधान शिबिराच्या माध्यमातून तात्काळ व सुलभपणे मिळत आहेत. समाधान शिबिराच्या माध्यमातून शासन आपल्या दारी आल्यामुळे या संधीचा नागरिकांनी मोठया प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सुधाकर देशमुख यांनी केले आहे.मंगळवारी झोन मधील नागरिकांसाठी शासनाकडून आवश्यक असलेले सर्व प्रमाणपत्र व परवानगी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले. सिव्हिल लाईन्स परिसरातील आॅफिसर्स क्लबच्या लॉनवर मुख्यमंत्री समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये २० प्रकारच्या परवानगी ११ विभागाकडून एकाचवेळी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. समाधान शिबिराचे उद्घाटन आमदार प्रा. अनिल सोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त भूषण शिंगणे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, मुख्यमंत्री सचिवालयाच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, नगरसेवक संदीप जाधव, मीनाताई तिडके, साधना भरडे, संगीता गिरे, विशाखा जोशी, सुनील अग्रवाल, किशन गावंडे, जगदीश ग्वालबंशी, अभय दीक्षित आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर सुधार प्रन्यास, महानगरपालिका, अन्न व नागरी पुरवठा विभाग, एमएसईबी व एसएनडीएल, बँक आॅफ इंडिया, ओसीडब्ल्यू आदी विभागाशी संबंधित असलेले प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था समाधान शिबिराच्या माध्यमातून करण्यात आली आहे. २७ आॅक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या समाधान शिबिरामध्ये मंगळवारी झोनमधील नागरिकांचे समाधान करण्यासाठी विभागनिहाय २० दालने तसेच आधारकार्ड, विवाह नोंदणी, जन्मनोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा अग्रणी बँकेतर्फे प्रधानमंत्री मुद्रा लोन, विमा योजना, भूमी अभिलेख कार्यालयातर्फे मालमत्तेसंबंधी आखीव पत्रिका देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शपथपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, वय अधिवास, व राष्ट्रीय प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या शिबिरामध्ये व्यवस्था आहे. (प्रतिनिधी)
समाधान शिबिरामुळे मिळाली विविध प्रमाणपत्रे
By admin | Updated: October 26, 2016 03:04 IST