लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाचपावली पोलिसांनी डीजे संचालकाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ शहरातील डीजे संचालकांनी बुधवारी पाचपावली पोलीस ठाण्याला घेराव घातला. मारहाण करणाºया अधिकारी-कर्मचाºयाला अटक करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली. डीजे संचालक तब्बल पाच तास ठाण्यासमोर ठाण मांडून होते. त्यामुळे पाचपावलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.२२ आॅगस्ट रोजी डीजे संचालक शिवानंद ऊर्फ शिवा वाघमारे (२५) रा. बांगलादेश लालगंज हा पोलीस ठाण्यात बेशुद्ध झाला होता. मारबत-बडग्या ठाण्यासमोरून जात होतो. त्याचवेळी पोलिसांनी शिवाला पकडून ठाण्यात आणले. शिवा बेशुद्द झाल्याचे माहीत होताच शिवाचे कुटुंबीय व डीजेचे संचालक आले. त्यांनी पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला. त्यांचे म्हणणे होते की, संतोष नावाच्या कर्मचाºयासमोरच पोलिसांनी शिवाला मारहाण केली. शिवासोबत असलेल्या गोलू यालाही मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता.शिवाला मारहाण करणाºया पोलीस अधिकारी-कर्मचाºयांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विदर्भ बॅक स्टेज आर्टिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी बुधवारी सकाळी ११.३० वाजता पाचपावली पोलीस ठाण्यात पोहोचले. ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनी वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा केल्यावर आपण तक्रार घेऊ, असे सांगितले. खूप उशीर होऊनही तक्रार घेतली जात नसल्याने डीजे संचालक संतप्त झाले. त्यांनी ठाण्याचा घेराव करीत नारेबाजी सुरू केली. आपल्या अधिकारी कर्मचाºयांना वाचवण्यासाठी तक्रार घेतली जात नसल्याचा त्यांनी आरोप केला. तणाव निर्माण होण्याच्या भीतीने पोलिसांनी तक्रार घेतली. तसेच वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा केल्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.परंतु गुन्हा दाखल होईपर्यंत आपण जाणार नाही, अशी डीजे संचालकांनी भूमिका घेतली. दरम्यान गोलूने पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार दाखल केली होती. परंतु दुपारी ३.३० वाजता गोलू मेयोमधून पोलिसांसोबत परत आला तेव्हा तक्रार परत घेण्यासाठी तयार झाला. त्यामुळे डीजे संचालकांमध्ये पुन्हा असंतोष पसरला. पोलीस गोलूवर दबाव टाकत असल्याने गोलूने यू टर्न घेतल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे पुन्हा नारेबाजी सुरू झाली. अखेर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यावर डीजे संचालक परतले. दरम्यान बुधवारी डीजे वाजवण्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या प्रवीण नावाच्या युवकाला न्यायालयातून जामीन मिळाला.
डीजे संचालकांचा पाचपावली पोलीस ठाण्याला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:52 IST
पाचपावली पोलिसांनी डीजे संचालकाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ शहरातील डीजे संचालकांनी बुधवारी पाचपावली पोलीस ठाण्याला घेराव घातला.
डीजे संचालकांचा पाचपावली पोलीस ठाण्याला घेराव
ठळक मुद्देमारहाणीचा निषेध : तणावाचे वातावरण