नागपूर : लॉकडाऊन घोषित झाल्याने सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश प्राप्त झाले. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांच्या उपस्थितीबाबत आदेश निर्गमित केले. पण, दोन्ही अधिकाऱ्यांच्या आदेशामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उपस्थितीबाबत बरीच तफावत आढळून आल्याने ऐकावे तरी कुणाचे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शिक्षण उपसंचालकांच्या पत्रात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत उल्लेखच नाही. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) नागपूर यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेत जाण्याची आवश्यक्ता नाही, असा उल्लेख त्यांच्या पत्रात केला आहे. पण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) गोंदिया यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत कोणताही उल्लेख करण्याचे टाळले आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात येऊ नये, असे सुधारित पत्र निर्गमित करण्याची मागणी भाजप शिक्षक आघाडीच्या संयोजिका डॉ. कल्पना पांडे व पूर्व विदर्भ संयोजक अनिल शिवणकर यांनी शिक्षण उपसंचालक (नागपूर) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.