शहरातील ८५५४ घरांचे सर्वेक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू आहे. शुक्रवारी शहरातील ८५५४ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी ३२१ घरात डेंग्यू अळ्या आढळून आल्या.
तसेच ८२ ताप असलेले रुग्ण आढळून आले. १६१ जणांच्या रक्ताचे नमूने तर ३० जणांचे रक्तजल नमूने घेण्यात आले. ११२४ घरांमधील कुलर्सची तपासणी केली. त्यात १२४ कुलर्समध्ये डासअळी आढळून आली. १४३ कुलर्स रिकामी करण्यात आले. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
डेंग्यू प्रतिबंधात्मक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरामध्ये किंवा परिसरात कुठेही डासोत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. डेंग्यू संबंधी कुठलीही सौम्य लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे.