लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकशाहीने शोषित, वंचित, उपेक्षित घटक आणि महिलांना स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग दिले. वंचितांना अधिकार देणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही. देशाने संविधान स्वीकारल्यानंतर ही लोकशाहीव्यवस्था निर्माण झाली आहे. कोणत्याही रक्तपाताशिवाय सामाजिक- आर्थिक क्रांती करणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे. लोकशाहीतील लाभ हे क्षणभंगुर नाहीत, तर टिकाऊ असतात, असे प्रतिपादन माजी कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले.
संविधानाच्या जनजागृतीसाठी संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित संविधान शाळेच्या चौथ्या संवादात ‘लोकशाही, अभिव्यक्तीस्वातंत्र्य व घटनात्मक मूल्य’ या विषयावर ते बोलत होते. यशदाचे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांनी हा संवाद साधला.
जोपर्यंत नागरिक प्रबुद्ध होत नाही तोपर्यंत लोकशाहीची प्रगल्भता आपल्याला प्राप्त होणार नाही. परस्परविरोधी विचार, संस्कृती, परंपरा व भाषा असलेल्या समूहाला एकत्र आणून त्याची मोट बांधत त्यातून राष्ट्रीयत्व निर्माण करण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केले. आपली घटना आणि घटनेतील राष्ट्रीयत्वाचे मूल्य अभेद्य राहण्याचे कारण म्हणजे शेकडो वर्षे ‘जी हुजूर’ व्यवस्थेची मानसिकता असलेल्या लोकांना स्वातंत्र्याच्या हक्काची जाणीव करून देत त्यांना आत्मभान व आत्मसन्मान देण्याचे काम लोकशाहीने केले, असेही डॉ. गव्हाणे म्हणाले. संवाद कार्यक्रमाचा समारोप करताना माजी सनदी अधिकारी व संविधान फाउंडेशनचे संस्थापक ई.झेड. खोब्रागडे यांनी संविधान जनजागृतीचे अभियान पुढे निरंतर चालविण्यासाठी ‘संविधान मित्र’ होण्याचे आवाहन केले. प्रारंभी, संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून निर्जरा मेश्राम यांनी संवाद कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रा. डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी आभार मानले.