माओवाद्यांचे कारागृहात उपोषणनरेश डोंगरे नागपूरयाकूब मेमनच्या फाशीला स्थगिती मिळावी या मागणीसाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहातील माओवाद्यांनी आमरण उपोषण सुरू केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. या घडामोडीमुळे कारागृह प्रशासनावर प्रचंड दडपण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.याकूबची क्युरेटीव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी खारीज केली. तेव्हापासून याकूबच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने हालचाली कमालीच्या तीव्र झाल्या आहे. पोलिसांनी अचानक येथे बंदोबस्त अत्यंत कडक केला आहे. पोलीस आणि संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी वगळता कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोरही कुणी भटकू नये, याची दक्षता घेतली जात आहे. बाहेर फाशीची सर्वत्र उलटसुलट चर्चा असताना कारागृहाच्या आत फाशीची रिहर्सल सुरू असल्याचेही वृत्त आहे. कारागृहाच्या बाहेर येणारे कैदी आतमधील वातावरणाची वाच्यता करताना आतमध्ये ‘याकूब भाईकाच माहौल है‘ असे सांगत आहेत. त्यातीलच एकाने कारागृहातील माओवाद्यांनी आतमध्ये आमरण उपोषण सुरू केल्याची माहिती गुरुवारी बाहेरच्यांना सांगितली. नागपूरच्या कारागृहात ५० पेक्षा जास्त कडवे माओवादी आणि त्यांचे समर्थक बंदिस्त आहे. तेवढेच माओवादी अमरावतीच्या कारागृहातही बंदिस्त आहेत. तिकडे हिंसा, इकडे गांधीगिरीमाओवादी आणि दहशतवादी हे नेहमीच हिंसेचे समर्थन करतात. आपल्या हक्कासाठी त्यांचा बॅलेटवर नव्हे तर बुलेटवर विश्वास असल्याचेही ते वेळोवेळी हिंसाचार करून दाखवतात. दुसरीकडे कारागृहात बंदिस्त असलेले माओवादी आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी नागपूरच्या कारागृहात नेहमीच ‘गांधीगिरी‘ करतात. सोयीसुविधा मिळत नसल्याचा आरोप करून माओवाद्यांनी यापूर्वी अनेकदा नागपूर कारागृहात आमरण उपोषण केले आहे. सध्या याकूबची फाशी देश-विदेशात चर्चेचा विषय ठरली आहे. त्याचे राजकीय भांडवल करणाऱ्या प्रतिक्रियाही पुढे येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता माओवाद्यांनी आमरण उपोषण सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे. याकूबच्या फाशीला स्थगिती मिळावी, यासाठी गुरुवारपासून नागपूर कारागृहात तर नंतर राज्यभरातील कारागृहात उपोषण सुरू करण्याची चर्चा कारागृहातील माओवादी करीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. असे झाल्यास एक नवाच वाद चर्चेला येऊ शकतो. कारागृह प्रशासनावरील दडपणातही प्रचंड वाढ होऊ शकते. दरम्यान, माओवाद्यांच्या उपोषणाची शहानिशा करण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हे वृत्त खरे की खोटे ते स्पष्ट झाले नाही.
याकूबच्या फाशीला स्थगिती देण्याची मागणी
By admin | Updated: July 24, 2015 02:45 IST