मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडीतील बंडखोर आ. दीपक केसरकर यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. शरद पवारांबद्दल आदर असला तरी सिंधुदुर्गातील नारायण राणेंची दहशत संपविण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे केसरकरांनी घाईघाईत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.केसरकर म्हणाले की, सिंधुदुर्गातील राणेंची एकाधिकारशाही आणि दहशत याविरोधात आपला लढा कायम राहणार आहे. आपली लढाई राणे व्यक्ती विरोधात नाही तर त्या प्रवृत्तीशी आहे. लोकसभेतील पराभवानंतरही राणेंच्या प्रवृत्तीत बदल झाला नाही. आघाडीच्या राजकारणामुळे विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी राणेंना विरोध करू शकत नाही. अशावेळी कोकणच्या विकासासाठी आणि राणेंची दहशत संपविण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना भाजपा आपल्या पक्षात घेणार नाही. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या लढ्याला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिल्याचे केसरकर म्हणाले.रविवारी सकाळी केसरकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेत आपली बाजू मांडली. येत्या आठ दिवसांत आमदारकीचा राजीनामा देत केसरकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादीत असणारे केसरकर कट्टर राणेविरोधक मानले जातात. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नीलेश राणे यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. (प्रतिनिधी)
दीपक केसरकरांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
By admin | Updated: July 14, 2014 04:27 IST