नागपूर : नागपूर शहरात सुरू असलेल्या कामामुळे चौफेर विकास होत आहे. जगातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शहरातील हिंगणा टी पॉईंट ते छत्रपती चौकदरम्यानच्या रस्त्याचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, माजी खासदार दत्ता मेघे, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार सुधाकर देशमुख, प्रा. अनिल सोले आदी उपस्थित होते.
स्थानिक वर्धा रोडवरील छत्रपती चौकापासून सुरू झालेला हा सिमेंट काँक्रिटीकरणचा रस्ता शहराच्या बाह्यभागाला जोडणार आहे. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून शहराच्या विविध भागांत जाणे-येणे सोयीचे होणार आहे. २८ किलोमीटरचा हा केंद्रीय रस्ते निधीमधून २७३ कोटी रुपये खर्चून तयार झालेला आहे. सिमेंट काँक्रिटीकरण असलेल्या रस्त्यावर वृक्षारोपण करण्यासाठी सेल्फ वॉटरिंग पाईप लावले असून अशा झाडांची काळजी घेण्याचे आवाहनसुद्धा गडकरी यांनी या क्षेत्रातील नागरिकांना तसेच मनपाच्या पदाधिकाऱ्यांना केले. अशाच प्रकारचा १२०० कोटींचा एक बाह्यवळण रस्ता दुसऱ्या भागात होणार असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या नागपूर शहराला हजार कोटींचा निधी दिला. त्याचा विशेष उल्लेख गडकरी यांनी यावेळी केला .नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानाची निविदा प्रक्रिया पुन्हा राज्य सरकारने काढावी हे काम रखडू नये, अशी विनंती त्यांनी राज्य शासनाला यादरम्यान केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सतीश अंभोरे केले. यावेळी शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, प्रकाश भोयर, गोपाल बोहरे, प्रमोद तभाने, किशोर वानखेडे आदी उपस्थित होते.
मेट्रोला बदनाम करण्याचा प्रयत्न दुर्भाग्यपूर्ण
सामान्यांना वाढदिवस साजरे करता यावे यासाठी मेट्रो रेल्वेने सेलिब्रेशन ऑन व्हील्स उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात वाढदिवसाच्या नावाखाली मेट्रो रेल्वेत हुल्लडबाजी करून मेट्रोला बदनाम करण्याचा प्रयत्न दुर्भाग्यपूर्ण असल्याचे नितीन गडकरी यावेळी म्हणाले.