डोंगरखर्डा येथील घटना : एकाच दोराने दोघांनीही घेतला गळफास निश्चल गौर - डोंगरखर्डा (यवतमाळ) कर्जाचा डोंगर आणि त्यातच नापिकी यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या एका शेतकरी दाम्पत्याने गळफास लावून आत्महत्या केली. पत्नीच्या आत्महत्येनंतर दुसर्या दिवशी पतीनेही त्याच दोराने गळफास लावून घेतला. ही घटना कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथे घडली. दाम्पत्याच्या आत्महत्येने तीन मुले मात्र पोरकी झाली. मारोती रामदास कुळसंगे (४५) आणि पत्नी सरस्वती मारोती कुळसंगे (४0) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथे कुळसंगे दाम्पत्याकडे पाच एकर शेती आहे. एक मुलगा आणि दोन मुली असे त्यांचे कुटुंब आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत होते. शेतात पिकत नसल्याने मारोती उपजीविकेसाठी भंगारचा व्यवसाय करीत होता. तर पत्नी दुसर्याच्या शेतात मोलमजुरी करीत होती. मारोतीवर सेंट्रल बँकेचे पाच वर्षांपासून कर्ज थकीत आहे. तर सरस्वतीने महिला बचत गटाकडून दहा हजार रुपये कर्ज घेतले आहे. शेती पिकत नाही, मजुरीत भागत नाही, अशा स्थितीत मुलांना कसे पोसायचे, त्यांच्या भविष्याचे काय अशी चिंता या दोघांना लागली राहायची. अशातच गुरुवार २९ मे रोजी सरस्वतीने दुपारी स्वयंपाक घरात गळफास लावला. शेजारी नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिला मेटीखेडा आरोग्य केंद्रात व नंतर यवतमाळ येथे उपचारासाठी नेले. उपचारादरम्यान सायंकाळी ७.३0 वाजता तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर सरस्वतीचा मृतदेह गावात आणण्यात आला. शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सर्व परिवार झोपी गेला. रात्री १ वाजताच्या दरम्यान पती मारोतीनेही पत्नीने आत्महत्या केलेल्या दोरानेच गळफास लावून घेतला. ही बाब शनिवारी सकाळी उघडकीस आली. आर्थिक विवंचनेतून कुळसंगे दाम्पत्याने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या दाम्पत्याच्या मागे काजल (१0), पल्लवी (९) या दोन मुली आणि राहूल (१४) हा मुलगा आहे.
कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या
By admin | Updated: June 1, 2014 00:54 IST