कन्हान : राेडवर उभा असलेल्या नादुरुस्त ट्रकवर भरधाव दुचाकी धडकून गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कन्हान पाेलीस ठाण्यांतर्गतच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील डुमरी शिवारात साेमवारी (दि. २०) रात्री १०.५० वाजताच्या सुमारास घडली.
मनीष रमेश नागाैत्रा (२८, रा. अरविंदनगर, पिवळी नदी, नागपूर) असे मृताचे नाव आहे. मनीष हा आपल्या दुचाकीने (क्र. एमएच-४९ बीपी-२१६८) नागपूरहून कन्हानमार्गे रामटेककडे एकटा जात हाेता. दरम्यान, महामार्गावरील डुमरी शिवारात राेडवर उभा केलेल्या ट्रकवर (क्र. एमएच ४० बीजी-५७५३) त्याची दुचाकी मागून धडकली. यात गंभीर दुखापत झाल्याने मनीषचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी आराेपी ट्रकचालकाविरुद्ध भादंवि कलम ३०४ (अ), २८३ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक आत्राम करीत आहेत.