सामोपचाराने तोडगा : विद्यार्थी, प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडलानागपूर : स्टार बसच्या चालक-वाहकांनी गेल्या दोन दिवसापासून अचानक संप पुकारल्याने शहरातील बस वाहतूक ठप्प झाली होती. परंतु गुरुवारी सहायक कामगार आयुक्ताकडे झालेल्या संयुक्त बैठकीत सामोपचाराने तोडगा निघाल्याने आपली बस कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. संप मिटल्याने विद्यार्थी, नोकदार व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सहायक कामगार आयुक्त आयुक्त गजानन शिंदे कार्यालयात बस कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. महापालिकेचे परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, प्रशासकीय अधिकारी अरुण पिपुरडे, कामगारांचे प्रतिनिधी अंबादास शेंडे, पे्रमशंकर मिश्रा, संतोष कन्हेरकर, युनिटी व बस आॅपरेटर यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कामगारांच्या मागण्यावर सामोपचाराने तोडगा काढण्यात आला, अशी माहिती महापालिकेचे अपर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे यांनी दिली. चालक-वाहकांना १६,६०० रुपये वेतन देण्यात यावे, अतिरिक्त कामाचा मोबदला मिळावा, जुन्या सर्व कामगारांना सेवेत समावून घेण्यात यावे, आदी मागण्यासाठी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या बॅनरखाली बसच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. यात ६०० चालक-वाहक सहभागी झाले होते. संपामुळे शहरातील २१० बसेसची वाहतूक बंद होती. दररोज बसचा प्रवास करणारे कर्मचारी , शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी व प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागले. दुसरीकडे संपाचा फायदा घेत आॅटो, ई-रिक्षा व व्हॅन चालकांनी मनमानी भाडे वसूल करून प्रवाशांना वेठीस धरले होते. मोटार वाहतूक कायद्यानुसार श्रम मंत्रालयाने निर्धारित केलेले किमान वेतन आपली बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात येते. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियमानुसार वेतन देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती. या बाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मार्गदर्शनासाठी पाठविण्यात येणार आहे. अभिप्रायानुसार यावर निर्णय घेतला जाणार आहे. किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात येईल. तसेच अतिरिक्त कामाचा मोबदला कर्मचाऱ्यांना दिला जाईल, अशी माहिती शिवाजी जगताप यांनी दिली. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांसाठी मोफत बसेस दोन दिवसांपासून स्टार बस कर्मचारी अचानक संपावर गेल्याने विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय झाली. परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी विना कंडक्टर मोफत बसेस चालविण्याचा निर्णय महापालिका प्रशसानाने घेतला. नवीन बस आॅपरेटने याला प्रतिसाद दिला. आयुक्तांच्या आदेशामुळे काही मार्गावर विद्यार्थी व प्रवाशांची सुविधा झाली.९० टक्के मागण्या यापूर्वी मान्यबस कर्मचाऱ्यांच्या ९० टक्के मागण्या यापूर्वी मान्य करण्यात आलेल्या आहेत. १० मागण्यांसंदर्भात चर्चा सुरू होती. यासाठी शहरातील विद्यार्थी व प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नव्हते. गुरुवारी खापरी व पटवर्धन मैदान येथील आगारातून काही बसेस सोडण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना सुविधा व्हावी, यासाठी विना कंडक्टर प्रवासीभाडे न आकारता शहरातील काही मार्गावर बसेस चालविण्यात आल्या. सहायक कामगार आयुक्तांकडे झालेल्या संयुक्त चर्चेत संपावर सामोपचाराने तोडगा निघाल्याने शुक्रवारपासून शहरातील बस वाहतूक सुरळीत सुरू राहील.- श्रावण हर्डीकर, आयुक्त महापालिका
संप मिटला; आपली बस ‘स्टार्ट’
By admin | Updated: March 31, 2017 02:59 IST