नागपूर : शहरातील रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणाचा सफाया करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. सीताबर्डी, व्हेरायटी चौक परिसरातील दुकानांचे अतिक्रमण हटविल्यानंतर गुरुवारी धंतोली परिसरातील दुकानांच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. तब्बल ४० दुकानांचे अतिक्रमण तोडण्यात आले. कारवाईला दुकानदारांनी विरोध केला. मात्र, त्यानंतरही कारवाई करण्यात आली.महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गुरुवारी सुरुवातीला धंतोली झोन अंतर्गत धंतोली व अजनी रेल्वे स्टेशन परिसरातील १५ धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढले. कुर्वे मॉडेल हायस्कूल कुंभारपुरा येथील शंकरजीचे मंदिर, जोशीवाडी येथील नागमंदिर, धंतोली गुलशन बार समोरील शंकर मंदिर, मेहाडिया चौकातील जनता हॉटेल जवळील शंकरजीचे मंदिर, मेहाडिया भवन ते बगिचा रोडवरील शंकरजीचे मंदिर, आशीर्वाद पॅलेस धंतोली येथील शंकरजीचे मंदिर, चाणक्य अपार्टमेंट धंतोली बगिच्याजवळील शंकरजीचे मंदिर, काँग्रेसनगर जवळील शंकरजीचे मंदिर, शाम पॅलेस काँग्रेसनगर येथील हनुमान मंदिर, अजनी रेल्वे स्टेशन काँग्रेसनगर येथील शंकरजीचे मंदिर, अजनी रेल्वे स्टेशन समोरील झेंडा व चबुतरा, अजवी रेल्वे स्टेशन समोरील शिव मंदिर, इम्प्रेशन प्लाझा काँग्रेसनगर येथील नाग मंदिर, नीलागगन अपार्टमेंट अम्बियार रोड धंतोली येथील साई मंदिर, दीनानाथ मंदिर धंतोली परिसरातील गणेश मंदिर हटविण्यात आले. यानंतर पथकाने कारवाई करीत आनंद टॉकीज ते मुंजे चौकदरम्यान मे. नरेशचंद्र अॅण्ड कंपनी यांनी दुकानासमोर ठेवलेल्या १३ सायकल जप्त करण्यात आल्या. बर्डी आनंद टॉकीज ते मुंजे चौक या मुख्य रस्तवरील नागपूर मोबाईल शॉप, सुपर फर्निचर, मॅजिक वर्ल्ड, मोबाईल मॅजिक, पल्लवी स्टुडिओ, लक्ष्मी केशवन क्लॉथ सेंटर, धंतोली परिसरातील स्वप्नील अपार्टमेंट, डीटीडीसी बोर्ड शेड, आदित्य इंटरप्राईजेस, महावीर मोबाईल, पद्मावती एम्पोरियम, महावीर किराणा स्टोर, अजनी रेल्वे स्टेशन परिसरातील ,सत्यम हेअर ड्रेसर्स, महावीर पान मंदिर, ताराविलास अपार्टमेंट आदी दुकानांचे शेड, बोर्ड व नामफलक हटविण्यात आले.या कारवाईत तीन ट्रक सामान जप्त करण्यात आले. सोबतच १३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. झोनचे सहायक आयुक्त सुभाषचंद्र जयदेव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक अरुण पिपुरडे, बर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संखे, उपअभियंता अनिल कडू, वाहतूक शाखा दक्षिणचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सरोदे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)
सीताबर्डीनंतर धंतोलीत कारवाई
By admin | Updated: May 22, 2015 02:43 IST