प्रवाशांना त्रास : अ दर्जाच्या रेल्वस्थानकासमोर दुर्गंधीनागपूर : रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडे संत तुलसीदास महाराजांच्या नावाने असलेल्या रस्त्यावर नेहमीच घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. या घाणीमुळे उपराजधानीतील मुख्य आणि अ दर्जाच्या रेल्वेस्थानकाच्या प्रतिभेवर आणि ऐतिहासिक इमारतीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. रेल्वेस्थानकाला लागूनच असल्यामुळे या रस्त्याला रेल्वेस्थानक रोड असे नावही देण्यात आले आहे. दररोज ५० हजार नागरिक या रस्त्यावरून ये-जा करीत असून त्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.रेल्वेस्थानकाच्या दोन्ही द्वारापर्यंत या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य दिसून येते. ऐतिहासिक इमारतीच्या सौंदर्यात बाधा उत्पन्न होणार नाही यासाठी या इमारतीसमोर कोणतीही विकासकामे अथवा निर्मिती होऊ शकत नाही. परंतु या इमारतीच्या अगदी समोर उड्डाणपूल तयार करण्यात आला. प्रवाशांची गर्दी पाहून रेल्वेस्थानकाच्या समोरील भागात पुलाखाली हॉटेल्स सुरू करण्यात आले. या हॉटेल्समधील कचरा, घाण तुळशीदास मार्गाच्या कडेला फेकण्यात येत असल्यामुळे या रस्त्यावर नेहमीच घाण साचलेली दिसते. जमा होते घाण पाणीरेल्वेस्थानकासमोरील हॉटेल्समधील भांडी धुतल्यानंतर त्याचे घाण पाणी या अरुंद रस्त्यावर फेकण्यात येते. हे घाण पाणी रेल्वेस्थानकासमोरील भिंतीशेजारी साचून राहते. या रस्त्यावर अनधिकृतरीत्या आॅटो उभे करण्यात येतात. परंतु शहर वाहतूक पोलीस ही वाहने हटविण्यासंदर्भात कुठलीच कारवाई करताना दिसत नाहीत. प्लास्टिकचे कप, उरलेले शिळे अन्न, फळांचे टरफल आणि इतर कचरा या घाणपाण्यावर फेकण्यात येतो. यामुळे या परिसरात नेहमीच दुर्गंधी पसरते. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांवरही वाहनांमुळे या घाण पाण्याचे थेंब उडतात.
रेल्वेस्थानकाच्या मार्गावर घाणीचे साम्राज्य
By admin | Updated: February 4, 2015 00:54 IST