लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : तालुक्यातील काही भागात आधीच उंदरांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. त्यातच हरीण व रानडुकरांचे कळप दाखल झाले असून, ते काेवळी पिके खाऊन फस्त करीत असून, नासाडीही करीत आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी संकटात सापडले आहेत.
तालुक्यातील हिवरा, पाचगाव, खैरी (बिजेवाडा), चारगाव, मानापूर, नगरधन व लोहडोंगरी या शिवारात हरीण व रानडुकरांचे कळप दाखल झाले आहेत. एका कळपात किमान ५० हरीण व ३५ रानडुकरे असल्याची माहिती या भागातील शेतकऱ्यांनी दिली. या भागातील शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात सोयाबीन, कपाशी, तुरीची पेरणी केली असून, काहींनी धानाचे पऱ्हेही टाकले आहेत. ही पिके बऱ्यापैकी माेठी झाली आहेत तर पऱ्हे राेवणीयाेग्य झाले आहेत.
त्यातच हरणांचा कळप दिवसा तर रात्रीला रानडुकरांचा कळप शेतात येतात आणि काेवळी पिके खाऊन नुकसान करीत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. रानडुकरांचे शेतकरी व मजुरांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. या भागात आधीच उंदरांची संख्या भरमसाट असून, त्यात माकड, हरीण व रानडुकरांनी भर घातली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, या वन्यप्राण्यांचा कायम बंदाेबस्त करण्याची व पिकांची तातडीने याेग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी खैरी बिजेवाडा (ता. रामटेक) येथील जयदेव डडोरे, रूपचंद डडोरे, देवेंद्र डडोरे, देवचंद डडोरे, सुनील बरबटे, राजू बरबटे, हिवराहिवरी येथील अण्णा चाफले, कमलाकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
...
बंदाेबस्त करणार काेण?
हरीण व रानडुकरांसाेबतच माकडांचाही उपद्रव वाढला आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांचा वेळीच याेग्य बंदाेबस्त करण्याची मागणी वन अधिकाऱ्यांकडे अनेकदा केली. मात्र, कुणीही लक्ष देत नाही, असा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.या वन्यप्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत आहे. वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीची भरपाई तुटपुंजी दिली जात असून, ती मिळण्यासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागते. त्याचे नियमही जटील आहेत. वन विभाग त्यांच्या वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत असल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.