लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : कुंदन देवाजी रंगारी (४०, रा. चित्तरंजननगर, झाेपडपट्टी, कामठी) याच्या खून प्रकरणात कामठी (नवीन) पाेलिसांनी दाेघांना नागपूर शहरातील इतवारी रेल्वेस्थानक परिसरात अटक केली. या दाेन्ही आराेपींना न्यायालयााने चार दिवसाची अर्थात बुधवार (दि. १३) पर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे. दाेघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली.
रोशन ऊर्फ तंट्या राजू लारोकर (२०, रा. पार्वतीनगर-शांतिनगर, कळमना नागपूर) व करण शंकर वानखेडे (२१, रा. चित्तरंजननगर, झोपडपट्टी, कामठी) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. या दाेघांनी शुक्रवारी (दि. ८) रात्री कुंदनला दारू पिण्यासाठी पाणी मागितले हाेते. कुंदनने पाणी न दिल्याने ते चिडले हाेते. याचा वचपा घेण्यासाठी शनिवारी (दि. ९) सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास कुंदन चहा पिण्यासाठी पायी जात असताना दाेघांनीही त्याला मध्येच गाठले आणि त्याच्यावर चाकूने वार केले. कुंदन खाली काेसळताच दाेघांनीही तिथून लगेच पळ काढला.
कुंदनला उपजिल्हा रुग्णालयात डाॅक्टरांनी मृत घाेषित करताच पाेलिसांनी खुनाचा गुन्हा नाेंदवून आराेपींचा शाेध सुरू केला. ते शनिवारी सायंकाळी नागपूर शहरातील इतवारी रेल्वेस्थानक परिसरात आढळून येताच दाेघांनाही ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्यांना रविवारी (दि. १०) कामठी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एन. गाढवे यांच्या न्यायालयासमाेर हजर केले हाेते. न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पाेलीस निरीक्षक सुरेश कन्नाके यांनी दिली.