नागपूर : कोरोना काळातील वीज बिल माफ करून ते सरकारने भरावे या मागणीसह विदर्भ राज्य निर्मिती आणि पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घेण्याच्या मागणीवर जनजागृती करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूर शहर शाखेच्या वतीने १५ सप्टेंबरला सायकल यात्रा काढणार आहे.
शहीद चौकातील विदर्भ चंडिका मंदिरातून प्रदेश युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वात सकाळी १०.३० वाजता ही यात्रा निघेल. गांधी पुतळा ईतवारी, बडकस चौक, कोतवाली पोलीस चौकी, गांधी गेट शिवाजी पुतळा, टिळक पुतळा, कॉटन मार्केट चौक, व्हेरायटी चौक, झांसी राणी चौक, पंचशील चौक, लोकमत चौक असे भ्रमण करून दुुपारी ३ वाजता दीक्षाभूमीवर समारोप होईल. सरकारने सत्तेवर येताना दिलेली आश्वासने पाळली नाही, त्यामुळे सरकारला आठवण करून देण्यासाठी आणि नागरिकांच्या जनजागरणासाठी ही सायकल यात्रा असल्याचे संयोजक राम नेवले यांनी सांगितले. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मासुरकर यांच्यासह महिला आघाडी शहर अध्यक्षा रेखा निमजे, कोर कमिटी सदस्य सुनीता येरणे, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रशांत जयकुमार, तात्यासाहेब मत्ते, विष्णू आष्टीकर, ज्योती खांडेकर, सचिन लोणकर आदींनी केले आहे.