लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बँकेने पुरेशी काळजी न घेतल्यामुळे गुन्हेगारांनी एका व्यापाऱ्याचे २६.५० लाख रुपये हडपले. मात्र, पोलिसांनी गुन्हेगारांनी हडपलेली पूर्णच्या पूर्ण रक्कम व्यापाऱ्याला परत मिळवून दिली. बँक अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचे अन् पोलिसांच्या तत्परतेचे उत्तम उदाहरण ठरलेली ही घटना कळमना परिसरातील आहे.
विनोद हेमनानी हे मसाल्याचे व्यापारी आहेत. त्यांचे आयसीआयसीआय बँकेत खाते आहे. या बँक खात्याची माहिती वेगळ्या क्रमांकावर देण्याची मागणी करणारा अर्ज एका गुन्हेगाराने बँकेत केला. तो अर्ज हेमनानी यांनीच केला की नाही, त्याची शहानिशा न करता बँकेने हेमनानी यांचा मोबाईल नंबर बदलवून त्या ठिकाणी अर्ज करणाऱ्या आरोपीचा मोबाईलनंबर दिला. त्याआधारे आरोपीने हेमनानी यांच्या खात्यातील २६ लाख ५० हजार रुपये लंपास केले. हा प्रकार लक्षात आल्याने हेमनानी यांना जबर मानसिक धक्का बसला. त्यांनी आधी बँकेत आणि नंतर सायबर शाखेत धावच घेतली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अशोक बागुल, राघवेंद्र क्षीरसागर, सहायक निरीक्षक विशाल माने, पोलीस कर्मचारी कुणाल हटेवार आणि विशाल पवार यांनी तत्परता दाखवत ती रक्कम गोठवली. त्यानंतर ही संपूर्ण रक्कम दोन दिवसांपूर्वी हेमनानी यांच्या खात्यात जमा करण्यात आली. अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी मानकापूरचे वासुमित्र मिश्रा यांच्या खात्यातून उडवलेले १ लाख ३२ हजार रुपयेसुद्धा याच पोलिसांनी मिश्रा यांना परत मिळवून दिले.
---
रक्कम परत मिळते
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ग्राहकाची चूक नसताना त्याच्या बँक खात्यातून कुणी रक्कम काढली किंवा ही रक्कम काढताना बँकेचा दोष उघड झाला तर ग्राहकाला ती रक्कम परत करण्याची जबाबदारी बँकेचीच आहे. अशा प्रकारे कुणाची फसवणूक झाल्यास त्यांना या नियमाचा आधार घेत बँकेला आपली रक्कम परत मागता येते, असेही पोलीस निरीक्षक बागुल यांनी सांगितले आहे.