कामठी : गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कामठी शहरातील अवैध कत्तलखान्यावर धाड टाकली. यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकूण ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. १३) मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
कामठी शहरात अवैधरीत्या कत्तलखाना चालविला जात असल्याची माहिती नागपूर शहर पाेलिसांच्या युनिट क्रमांक-५च्या गुन्हे शाखेला मिळाली हाेती. गुन्हे शाखेच्या पथकाने कामठी (जुनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भाजीमंडी परिसरात असलेल्या या अवैध कत्तलखान्याची पाहणी केली आणि खात्री पटताच धाड टाकली. या कारवाईमध्ये पाेलिसांनी तिथून ९० हजार रुपये किमतीचे विविध साहित्य जप्त केले. शिवाय, गुलजार मकबूल अहमद कुरेशी (४४, रा. भाजीमंडी, कामठी), तौसिफ मोहम्मद अशफाक कुरेशी (२२, रा. मदन चौक, कामठी), नौसिफ अली रौसप अली (२३, रा. भाजीमंडी, कामठी), अब्दुल अन्सार अब्दुल कुरेशी (३०, रा. कोळसा टाल, कामठी) व स्लोटर हाऊसचा मालक इम्रान शकील अहमद कुरेशी (३४, रा. भाजीमंडी, कामठी) या पाच जणांविरुद्ध गुन्हा नाेंदविला. ही कारवाई गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश भलावी यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक नितीन मदनकर करीत आहेत.