लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात १६ जानेवारीपासून कोविशिल्ड लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. या लसीकरण माेहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गुरुवारपर्यंत (दि. ११) ९४६ नागरिकांना ही लस देण्यात आली. ही माेहीम चार टप्प्यात राबविली जाणार असून, नागरिकांनी न घाबरता लसीकरणाला सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रकाश उजगरे यांनी दिली.
कोविशिल्ड ही लस पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱ्या फेरीत ही लस शासकीय व खासगी दवाखान्यांमधील डाॅक्टर, परिचारिका, परिचर, इतर कर्मचारी, पाेलीस व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी, पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविकांना देण्यात आली आहे. लसीकरणानंतर त्या व्यक्तीला काही साईड इफेक्ट हाेत आहेत की नाही, हे तपासून बघण्यासाठी अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवले जाते. त्यानंतर त्यांना काेणती काळजी घ्यायची आहे, याची माहिती देऊन सुटी दिली जाते, असेही डाॅ. प्रकाश उजगरे यांनी सांगितले.
ही लस घेतल्यानंतर काेणताही त्रास जाणवला नाही किंवा साईड इफेक्ट दिसून आला नाही, अशी माहिती डॉ. हेमंत वरके, परिचारिका संगीता इनवाते, कुसुम ठाकूर, सुरक्षा रक्षक अमित घोडाकाडे, विवेक कापटे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी दिली. तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षे व त्यापुढील शुगर, बीपी, हायपरटेन्शन असलेल्या नागरिकांना तसेच चाैथ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना ही लस देण्यात येणार असल्याचे डाॅ. प्रकाश उजगरे यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणाला न घाबरता लसीकरण करून कोरोनामुक्तीसाठी कार्याला सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश उजगरे यांनी केले आहे.