सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार : पिंटू झलके यांचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिघोरी येथील रामलीला लॉन येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. सेंटरची क्षमता २० खाटांची आहे. यात प्रामुख्याने सौम्य व अति सौम्य लक्षणे असलेले, ज्यांचा सिटी स्कोर १० पेक्षा कमी आहे व ज्यांची ऑक्सिजन लेव्हल ९४ पेक्षा अधिक आहे अशाच कोविड रुग्णांना येथे ठेवले जाणार आहे. माफक दरात उपचार होतील. मनपा स्थायी समितीचे माजी सभापती विजय झलके यांच्या उपस्थितीत रविवारी केअर सेंटर सुरू करण्यात आले.
सेंटरचे प्रमुख व महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. मनीष पाटील, रामलीला लॉनचे संचालक पंकज चकोले, दीपक चकोले यांच्यासह डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. शहरातील एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता या कोविड केअर सेंटरचा फायदा नागरिकांना व्हावा यासाठी मनीष पाटील यांनी विजय झलके यांच्या सहकार्याने हे केअर सेंटर सुरू केले. कोविडचा वाढता प्रकोप लक्षात घेता नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप इत्यादी लक्षणे दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन झलके यांनी केले आहे.