लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : दुचाकीवरून आलेल्या दाेन अज्ञात आराेपींनी चाकूच्या धाकावर दाम्पत्याकडील राेख ३,५०० रुपये व साेन्याची पाेत असा नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून पाेबारा केला. ही घटना एमआयडीसी बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळघाट-मांडवा मार्गावरील रिलायन्स रेल्वे पुलाखाली साेमवारी (दि.२२) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
प्रवीण बाळू वागदे (३२, रा. मांडवा, ता. हिंगणा) हे आपल्या पत्नीसह एमएच-४०/एबी-५७११ क्रमांकाच्या दुचाकीने टाकळघाट येथून मांडवा गावी जात हाेते. दरम्यान, मार्गातील रिलायन्स रेल्वे पुलाखाली पल्सर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दाेन आराेपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून अडविले. त्यानंतर आराेपींनी प्रवीण वागदे यांच्याकडील राेख ३,५०० रुपये राेख व ५,५०० रुपयाची साेन्याची पाेत असा एकूण नऊ हजार रुपयाचा मुद्देमाल चाकूच्या धाकावर हिसकावून पळ काढला. वागदे यांनी लगेच एमआयडीसी पाेलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार दाखल केली. याप्रकरणी एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपींचा शाेध सुरू केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक दराडे करीत आहेत.