एन.आर.नारायण मूर्ती यांचे टीकास्त्र : ‘हार्डवेअर’ निर्मिती क्षेत्रात समोर येण्याची संधी गमावली नागपूर : ‘सॉफ्टवेअर’च्या क्षेत्रात आपला देश समोर असला तरी ‘हार्डवेअर’मध्ये अजूनही फारशी प्रगती नाही. भारताकडे क्षमता असतानादेखील केवळ भूतकाळातील केंद्र सरकारांच्या धोरणांमुळे या क्षेत्रात देशाचे नुकसान झाले व जगाचे नेतृत्व करण्याची संधी गमावली, अशी टीका ‘इन्फोसिस’चे माजी चेअरमन एन.आर.नारायण मूर्ती यांनी केली. नागपूर येथे अभियंता दिनानिमित्त बुधवारी ‘इंजिनिअर्स फोरम’तर्फे आयोजित कार्यक्रमात मूर्ती यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.संगणक तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या ‘हार्डवेअर’संदर्भात चीनला जगाची ‘फॅक्टरी’ म्हणण्यात येते. आपल्या देशातदेखील ही क्षमता होती. परंतु १९७५ ते १९९१ दरम्यानच्या केंद्र सरकारच्या धोरणांमुळे उत्पादक अक्षरश: ‘बॅकफूट’वर गेले. उत्पादनांवरील जास्त कर व विविध निर्बंधामुळे देशाने ‘हार्डवेअर’ क्षेत्रात समोर येण्याची मोठी संधी गमावली, असे एन.आर.नारायण मूर्ती म्हणाले. दरम्यान, ‘सॉफ्टवेअर’ क्षेत्रात जगभरामध्ये भारतीयांचा दबदबा कायम असून यामुळे भारताला एक नवा विश्वास प्राप्त झाला आहे. देश आज जगातील ‘सॉफ्टवेअर सेंटर’ झाला आहे.२४ तास कामाची प्रणाली व ‘जीडीएम’ (ग्लोबल डिलीव्हरी मॉडेल) यामुळे भारतीय ‘सॉफ्टवेअर’ क्षेत्राने खरी भरारी घेतली व आज देशातील सर्वात जास्त रोजगार ‘आयटी’ क्षेत्रातच निर्माण होत आहेत. या क्षेत्रात आणखी प्रगती करण्यासाठी कंपन्यांनी ‘मल्टिकल्चर’ प्रणालीचा अवलंब करून जगातील सर्वच देशातून मनुष्यबळाची भरती केली पाहिजे असे ते म्हणाले.यावेळी ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार, ‘इंजिनिअर्स फोरम’चे अध्यक्ष सुरेश नशिंदे, कोषाध्यक्ष एस.आर.गढेवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. देशातील निर्मिती क्षमता वाढीस लागायला हवी व पूर्ण ‘प्रोडक्ट’ येथेच तयार व्हावेत यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन विश्राम जामदार यांनी केले. यावेळी नारायण मूर्ती यांच्या हस्ते निबंधस्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात अले. यात ‘व्हीएनआयटी’चा प्रथमेश जोशी, प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रदीप अटोले व सेंट विन्सेन्ट पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालयाची रिया चक्रवर्ती यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुरेश शिंदे यांनी केले तर महेश गुप्ता यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)
भूतकाळातील शासनांमुळे देशाचे नुकसान
By admin | Updated: September 17, 2015 03:46 IST