नागपूर : ग्राम पंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे. मात्र निवडणूक आयोगाचे सर्व्हर अचानक डाऊन झाल्याने इच्छुकांचे मंगळवारी ठोके वाढले. सर्व्हर डाऊनची परिस्थिती उद्या, बुधवारी अखेरच्या दिवशीची कायम राहिल्यास उमेदवारी अर्ज भरायचा कसा प्रश्न निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणासाठी जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली.
नागपूर जिल्ह्यातील १३० ग्रा.पं.साठी १५ जानेवारीला निवडणूक होऊ घातली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र तर कुठे स्वतंत्र निवडणूक लढवित आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवत भाजपा नेते आपली व्यूहरचना आखत आहे. त्यामुळे ऐन थंडीत जिल्ह्यातील राजकीय पारा चढला आहे. इकडे उमेदवारी अर्ज दाखल सादर करण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असला तरी बहुतांश ग्रा.पं.साठी अद्यापही राजकीय पक्षांच्या समर्थकांचे पॅनेल निश्चित झालेले नाही. हा घोळ सुरु असताना मंगळवारी जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अपक्ष उमेदवारांची मोठी गर्दी झाली. इकडे निवडणूक आयोगाचे सर्व्हर संथगतीने चालत असल्याने संगणक संस्थापुढे उमेदवारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. दिवसभर सर्व्हर डाऊनचा खेळ चालल्यानंतर सायंकाळी निवडणूक आयोगाने अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांचा जीव भांड्यात पडला.