न्या. पी. बी. सावंत : मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे अधिवेशननागपूर : देशातील लोकांना बेरोजगारी, विषमता आणि गुलामीतून मुक्त करणे गरजेचे असून, केवळ नोटा बदलून काळा पैसा व भ्रष्टाचार नष्ट होणार नाही, तर त्यासाठी व्यवस्थाच बदलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी केले.मानकापूर येथील क्रीडा संकुलात आयोजित महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशनात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष संजय घोडके होते. प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे संचालक अभिजित देशपांडे, महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे, महापारेषण कंपनीचे संचालक ओमप्रकाश एम्पाल, स्वतंत्र मजदूर युनियनचे अध्यक्ष जे. एस. पाटील, सरचिटणीस एन. बी. जारोंडे, कार्याध्यक्ष प्रेमानंद मौर्य, मुख्य संघटक एस. के. हनवते उपस्थित होते. माजी न्या. सावंत म्हणाले, सध्याच्या काळात जगातील कामगारांवर आपत्ती आली आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार ६९ टक्के कामगारांची कपात होणार आहे. त्यामुळे घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होण्यासाठी लढा देण्याची गरज आहे. महावितरणचे संचालक अभिजित देशपांडे, चंद्रकांत थोटवे, ओमप्रकाश एम्पाल यांनी कंपन्यांसमोर उभ्या असलेल्या आव्हानांवर व स्पर्धेवर प्रकाश टाकला. प्रास्ताविक एन. बी. जारोंडे यांनी केले. संचालन एच. पी. ढोके यांनी केले. आभार ए. जी. पठाण यांनी मानले.यावेळी ऊर्जा श्रमिक मुखपत्राचे लोकार्पण करण्यात आले. अॅड. वैशाली डोळस यांनी भारतीय महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर प्रकाश टाकला. अधिवेशनाला महाराष्ट्रासह देशाच्या इतर राज्यातील सहा हजार वीज कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नोटा बदलीने भ्रष्टाचार संपणार नाही
By admin | Updated: February 14, 2017 02:17 IST