४ फेब्रुवारीला रामेश्वरमसाठी होणार रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परिस्थिती आणि अडचणींवर मात करीत यशाच्याही पुढचा पल्ला गाठणाऱ्या मनपा शाळेच्या विद्यार्थिनी आता अंतरिक्षामध्ये झेप घेण्यास सज्ज झालेल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या चार भिंतीच्या आत विज्ञानाचे धडे घेत अंतरिक्षाचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाती विनोद मिश्रा व काजल रामनरेश शर्मा या दोन्ही विद्यार्थिनी ७ फेब्रुवारीला उपग्रहांच्या जागतिक रेकॉर्डमध्ये सहभागी होऊन स्वत:च्या ध्येयपूर्तीचा मार्ग भक्कम करीत इतरांसाठी प्रेरणा ठरणार आहेत. उद्या गुरुवारी ४ फेब्रुवारी रोजी तामिळनाडू एक्सप्रेसने दोन्ही विद्यार्थिनी रामेश्वरमसाठी रवाना होणार आहेत.
तामिळनाडू मधील रामेश्वरम येथे देशभरातील १ हजार विद्यार्थी जागतिक रेकॉर्ड करणार आहेत. या विक्रमासाठी देशभरातील १ हजार विद्यार्थी १०० उपग्रह तयार करीत असून, यामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या स्वाती मिश्रा व काजल शर्मा या दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे. स्वाती आणि काजल ने फेम्टो हे उपग्रह तयार केले आहे. हे उपग्रह अंतराळात ३३ हजार ते ३८ हजार मीटर उंचीवर जाऊन प्रत्यक्ष वातावरणाची माहिती घेईल व ती माहिती पृथ्वीला पाठविणार आहे. फेम्टो या उपग्रहाचे वजन केवळ ५० ते ८० ग्रॅम असून, ते अडीच ते ४ सेमीचे असेल. या उपग्रहाच्या निर्मितीसंदर्भात दोन्ही विद्यार्थिनींनी ऑनलाईन प्रशिक्षण घेतले. शिवाय नुकतेच त्यांचे ऑफलाईन प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. एसझेडआय वर्ल्ड रेकॉर्ड या आंतरराष्ट्रीय व्हॉट्सॲप ग्रुपवर त्यांच्या शंका, प्रश्नांचे वेळोवेळी निराकरण केले जात आहे. एकूणच संपूर्ण मोहीम आता अंतिम टप्प्यात आली आहे. ७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांमार्फत तयार करण्यात आलेले १०० उपग्रह अंतराळात सोडले जाणार आहेत.