नागपूर : कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत नव्या विक्रमाला सुरुवात झाली आहे. शनिवारी रुग्णसंख्येचा नवा विक्रम स्थापित झाला. एकाच दिवशी २२६१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मागील वर्षी १३ सप्टेंबर रोजी रुग्संख्येने उच्चांक गाठत २३४३ बाधितांची नोंद झाली होती. सहा महिन्यांनी पुन्हा १३ तारखेलाच या रुग्णसंख्येच्या जवळ बाधितांची संख्या पोहोचली; परंतु घाबरण्याचे कारण नाही. सप्टेंबरमध्ये रुग्णवाढीचा दर ४.४६ टक्के तर मृत्यूदर २.७१ टक्के होता. सध्या रुग्णवाढीचा दर हा १.३४ टक्के तर मृत्यूदर ०.१५ टक्के आहे; मात्र रुग्णवाढीमुळे कोरोना प्रतिबंधकाचे नियम पाळणे अधिक गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रुग्णांची एकूण संख्या १६८२५० झाली असून, मृतांची संख्या ४४४७ वर पोहोचली आहे.
नागपूर जिल्ह्यात आज पुन्हा चाचण्यांची संख्या वाढली. ८७८९ आरटीपीसीआर तर २२३० रॅपिड ॲन्टिजन असे एकूण ११०१९ चाचण्या झाल्या. सर्वाधिक ४३४४ चाचण्या खासगी लॅबमध्ये झाल्या. यातून ५२६ रुग्ण पॉझिटिव्ह तर ३८१८ संशयित रुग्ण निगेटिव्ह आले. मेडिकलच्या प्रयोगशाळेत १२३५ चाचण्यांमधून २७२ पॉझिटिव्ह व ९६३ निगेटिव्ह, मेयोच्या प्रयोगशाळेत ११४५ चाचण्यांमधून २८७ पॉझिटिव्ह व ८५८ निगेटिव्ह, एम्सच्या प्रयोगशाळेत ६०१ चाचण्यांमधून १९७ पॉझिटिव्ह व ४०४ निगेटिव्ह, नीरीच्या प्रयोगशाळेत २८८ चाचण्यांमधून ११२ पॉझिटिव्ह व १७६ निगेटिव्ह तर, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत ११७६ चाचण्यांमधून ७७७ पॉझिटिव्ह तर ३९९ निगेटिव्ह आले आहेत. एकूणच आरटीपीसीआर चाचणीतून २१७१ तर ॲन्टिजन चाचणीतून ९० रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
-शहरात १८४४ तर, ग्रामीणमध्ये ४१५ रुग्ण
नागपूर जिल्ह्यात आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १८४४ तर ग्रामीणमधील ४१५ रुग्ण आहेत. जिल्हाबाहेरील २ रुग्ण आहेत. मृतांमध्ये शहरातील २, ग्रामीणमधील ३ तर जिल्हाबाहेरील २ मृत्यू आहेत. शहरात बाधितांची एकूण संख्या १२४४४५ असून, मृतांची संख्या २८६० झाली आहे. ग्रामीणमध्ये रुग्णांची एकूण संख्या ३२८२८ असून, मृतांची संख्या ७९२ झाली आहे. विशेष म्हणजे, जिल्हाबाहेरील रुग्णांची संख्याही मोठी आहे. आतापर्यंत ९७७ रुग्ण आढळून आले. यातील ७९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
-कोरोनाचे १५४२३ रुग्ण अॅक्टिव्ह
सध्याच्या स्थितीत कोरोनाचे १५४२३ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. ही संख्या आरोग्य यंत्रणेची धाकधूक वाढविणारी आहे. यातील ४३१७ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत, तर १११०६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. आज १०२२ रुग्ण बरे झाले असून, कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १४८३८० झाली आहे. बरे होण्याचा दर ८८.१९ टक्क्यांवर आला आहे.
-सप्टेंबरसारखी स्थिती नाही
:: १३ सप्टेंबर ७९७३ चाचण्या, २३४३ रुग्ण व ४५ मृत्यू
::१३ मार्च ११०१९ चाचण्या, २२६१ रुग्ण व ७ मृत्यू
::कोरोनाची स्थिती
दैनिक चाचण्या: ११०१९
ए. बाधित रुग्ण :१६८२५०
सक्रिय रुग्ण :१५४२३
बरे झालेले रुग्ण :१४८३८०
ए. मृत्यू : ४४४७