नरखेड : नरखेड तालुक्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना तातडीने उपचार मिळणे आवश्यक आहे. अशात तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व कोविड केअर सेंटरच्या ९ पैकी ७ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे केवळ दोन डॉक्टरवर तालुक्याचा भार आला आहे. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडी व कोविड केअर सेंटरची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. येथे सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरची क्षमता पूर्ण झाली आहे. ऑक्सिजन बेडची सुविधा नसल्याने रुग्णांचे बेहाल होत आहे. बाधित रुग्णांना ऑक्सिजनची पूर्तता करण्यासाठी नागपूर, अमरावती, वरुड येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात येते. पण तिथेही ऑक्सिजन बेड शिल्लक नसल्यामुळे रुग्णांना परत येण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही. त्यामुळे हा निर्माण झालेला कठीण प्रसंग रुग्णांच्या जीवावर बेतणारा नक्कीच आहे. एवढी बिकट समस्या निर्माण झाल्या नंतर सुद्धा नागरिक कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करताना हलगर्जीपणा करताना दिसत आहेत. ग्रामीण रुग्णालय व कोविड केअर सेंटरची नगराध्यक्ष अभिजित गुप्ता, मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांनी पाहणी केली असता आरोग्य अधीक्षक डॉ. दत्तात्रय वनकडस यांनी डॉक्टरांची, कर्मचाऱ्यांची कमतरता, ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यांनी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पालकमंत्री नितीन राऊत, आ.अनिल देशमुख यांना दुरध्वनीवरून याबाबत अवगतही केले. यासोबतच तालुक्यात तातडीने पर्याप्त सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
कोरोनाचा कहर, त्यातच ९ पैकी ७ डॉक्टर बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:08 IST