नागपूर : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात असली तरी रुग्णसंख्येचा चढ-उतार पाहायला मिळत आहे. रविवारी शहरात ६ रुग्णांची नोंद झाली असताना, सोमवारी १९ रुग्णांची भर पडली. तर ग्रामीणमध्ये रविवारी ९ तर सोमवारी २ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,७७,३५२ तर मृतांची संख्या ९,०३४ वर स्थिरावली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात होताच चाचण्यांची संख्या वाढून २९ हजारापर्यंत गेली होती. सध्या रुग्णसंख्या कमी असली तरी सहा ते आठ हजारादरम्यान तपासण्या होत होत्या. परंतु सोमवारी फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच सर्वात कमी चाचण्या झाल्या. शहरात ४,११६ तर ग्रामीणमध्ये केवळ २९१ असे एकूण ४,४०७ संशयित रुग्णांच्या चाचण्या झाल्या. जिल्ह्यात पॉझिटिव्हिटीचा दर ०.४७ टक्के, शहरात ०.४६ टक्के तर ग्रामीणमध्ये ०.६८ टक्के होता. आज ४२ रुग्ण बरे झाल्याने कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढून ४,६८,१९९ झाली आहे. ९८.०८ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.
- कोरोनाचे ११९ रुग्ण सक्रिय
एप्रिल महिन्यात कोरोनाचे ७७ हजारांवर कोरोनाचे रुग्ण सक्रिय होते. परंतु अडीच महिन्यातच ही संख्या कमी होऊन सोमवारी ११९ वर आली आहे. यातील १९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर, १२५ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयात उपचाराखाली आहेत. मेडिकलमध्ये २९, मेयोमध्ये ४ तर एम्समध्ये ५ रुग्ण आहेत.
:: कोरोनाची सोमवारची स्थिती
दैनिक चाचण्या : ४,४०७
शहर : १९ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : २ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,७७,३५२
ए. सक्रिय रुग्ण : ११९
ए. बरे झालेले रुग्ण : ४,६८,१९९
ए. मृत्यू : ९,०३४