नागपूर : वाढत्या कोरोनाचा फटका आता विद्यार्थ्यांनाही बसू लागला आहे. मेडिकल व डेंटलच्या १२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने सोमवारी खळबळ उडाली. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांचे वसतिगृहच हॉटस्पॉट ठरू पाहत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. तूर्तास सर्व विद्यार्थ्यांना मेडिकलच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये भरती केले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मागील दोन आठवड्यांपासून नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या क्षेत्रातील नऊ वसाहती कोरोनाच्या हॉटस्पॉट झाल्याची कबुली स्वत: मनपा आयुक्तांनी दिली. याच धर्तीवर आता मेडिकल व डेंटलचे वसतिगृहही हॉटस्पॉट ठरू पाहत तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. मागील दोन वर्षांपासून मेडिकलच्या ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमासाठी २५०, तर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील (डेंटल) ‘बीडीएस’ अभ्यासक्रमाला ५६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. दोन्ही महाविद्यालयांचा ऑल इंडियाचा म्हणजे बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांचा १५ टक्के कोटा असतो. यावर्षी कोविडच्या प्रादुर्भावामुळे दोन्ही महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया उशिरा झाली. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली, त्यांना आरटीपीसीआर चाचणी करूनच वसतिगृहात प्रवेश देण्यात आला
-सर्वांची प्रकृती स्थिर
मेडिकल व डेंटलचे मिळून १२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. यांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. लागण कुठून झाली याचाही शोध घेतला जाईल.
-डॉ. अविनाश गावंडे
वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल