मार्च महिन्यापासून सुरू झालेली कोरोनची महामारी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आपल्या उच्चांकावर होती. परंतु ऑक्टोबरपासून ती नियंत्रणात आली. सिरो सर्वेक्षणातून हर्ड इम्युनिटीच्या दिशेने वाटचाल, प्लॅटिना प्लाझ्मा थेरपीसह कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड या प्रतिबंधक लसीची मानवी चाचणीला सुरुवात झाल्याने काहीसे दिलासादायक चित्र निर्माण झाले. नव्या वर्षाला सुरुवात होऊन दोन महिने होत नाही तोच मार्च महिन्यात कोरोनाच्या विषाणूने दहशत माजविली. ११ मार्च रोजी नागपुरात पहिल्या कोरोनाबाधिताची नोंद होताच खळबळ उडाली. पायाभूत सोयी नसताना मेयो, मेडिकलने बाधितांची जबाबदारी घेतली. रुग्णालयाच्या दिनचर्येत कायमचे बदल झाले. दोन्ही रुग्णालयात ६०० खाटांचे ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’ सुरू झाले. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्णांची व मृत्यूची भर पडली. याच दरम्यान दोन्ही रुग्णालयातील ५०० वर डॉक्टर, २०० वर परिचारिका तर १५०वर कर्मचारी बाधित झाले. सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. परंतु कुणी माघार घेतली नाही. कोरोनावर मात करीत पुन्हा रुग्णसेवेत रुजू झाले. काही स्वत:ला कुटुंबापासून दूर करीत खासगी हॉटेलमध्ये किंवा घराच्या एका स्वतंत्र खोलीत क्वारंटाईन झाले.
ऑक्टोबर महिन्यात बाधितांचा वेग मंदावला. नव्या वर्षात लसीकरणाला सुरुवात होणार असली तरी कोविडच्या रुग्णसेवेत असलेले डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे युद्ध मात्र आजही सुरूच आहे.-कोरोनाशी लढताना वडील, आईपणाचाही लढा सुरूच डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा कोरोनाशी अविरतपणे लढा सुरूच आहे. आपल्यामुळे घरातील लोकांना कोरोना होऊ नये म्हणून काळजी घेत आहेत. कोविड वॉर्डात सेवा देणाऱ्यांचे तर कोरोनासोबतच त्यांचे वडील व आईपणही लढा देत आहेत. तयारीनिशी रोज या लढाईत उतरत आहेत. रुग्णालयातून घरी गेल्यानंतर स्वत:लाच होम क्वारंटाईन करीत आहेत. आपल्या जवळच्या व्यक्तींना चिमुकल्यांना दूर ठेवत आहेत. अश्रू लपवून त्यांना धीर देत आहेत. पुन्हा सर्व विसरून दुसऱ्या दिवशी रुग्णालयात जात आहेत. त्यांचा हा रोजचा संघर्ष नऊ महिने होऊनही संपलेला नाही. -कोरोना विषाणूचा घरातील कर्त्या पुरुषावरच घाला कोरोनाची सर्वाधिक लागण ३० ते ५० वयोगटामध्ये झाली. याचे प्रमाण ३९.८० टक्के आहे तर ५१ व त्यापुढील वयोगटातील रुग्णांच्या मृत्यूची टक्केवारी ७६.१२ टक्के आहे. कोरोना विषाणूने घरातील कर्त्या पुरुषावरच घाला घातल्याने काही कुटुंब रस्त्यावर आली, तर काही कुटुंब अजूनही या धक्क्यातून सावरली नाही.
- मरण पावलेल्या योद्धयांच्या कुटुंबीयाच्या नशिबी केवळ संघर्ष
कोरोनाच्या लढ्यात डॉक्टरांसोबतच, परिचारिका, कर्मचारी, पोलीस आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावित आहेत. लढाई लढताना प्रतिबंधक उपाययोजना करूनही अनेकांना लागण होत आहे. काही उपचार घेऊन बरे होत आहेत तर काहींचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. राज्य शासनाने कोरोना साथप्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधित कर्तव्ये पार पाडणाऱ्या शासकीय, खासगी, कंत्राटी, बाह्य स्रोतांद्वारे घेतलेले कर्मचारी, मानसेवी, तदर्थ कर्मचारी अशा सर्व कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमासंरक्षण पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित संस्थांनी मृत कोरोना वॉरियर्सच्या प्रस्तावांचे फाईल शासनाकडे पाठविल्या आहेत. परंतु अद्यापही मदत मिळाली नाही. अनेकांच्या घरातील कर्ता व्यक्तीच गेल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.
-२५ टक्क्यांनी वाढला मानसिक आजार
कोरोनामुळे लोकांच्या शारीरिक स्थितीसोबतच मानसिक स्थितीवर सुद्धा परिणाम झाला. आजाराच्या भीती आणि चिंतेमुळे मानसिक आजाराच्या रुग्णांत साधारण २५ टक्क्यांनी वाढ झाली. यातच ज्यांना आधीपासून मानसिक समस्या होत्या त्यांच्या लक्षणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.
-मानवी चाचणीत नागपूरकर आघाडीवर
कोरोनाचा सुरुवातीपासून एकच चर्चा सुरु आहे, ती म्हणजे कोरोनाविरोधात लस बाजारात कधी येणार? याच दरम्यान २८ जुलै रोजी भारतात तयार करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचण्यांना राज्यात नागपुरातील गिल्लुरकर हॉस्पिटलमधून सुरुवात झाली. २४ सप्टेंबर रोजी ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’ची ‘कोविशिल्ड’ लसीची चाचणी मेडिकलमध्ये सुरू झाली. नोव्हेंबर महिन्यापासून कोव्हॅक्सीन लसीचा तिसरा टप्पा सुरू झाला. तब्बल १५०० हजार स्वयंसेवकांना लस दिली जात आहे. विशेष म्हणजे, लस घेतलेल्या सर्व स्वयंसेवकांची प्रकृती उत्तम आहे.
-नागपूरकरांची हर्ड इम्युनिटीच्या दिशेने वाटचाल
किती जणांना त्यांच्या न कळत कोरोना होऊन गेला आहे याची माहिती घेण्यासाठी नागपूर जिल्ह्यात सिरो सर्वेक्षण करण्यात आले. यात शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज वाढल्याचे समोर आले. नागपूरकरांची हर्ड इम्युनिटीच्या दिशेने वाटचालीला सुरुवात झाली.
-मास्कच्या काळाबाजारावर अखेर वचक
कोरोनाशी लढा देत असताना काही व्यवसायी जादा पैशांचा लोभापायी मास्कचा काळाबाजार करीत होते. शासनाने या मास्कचा किमती निश्चित केल्या. परंतु मोठ्या प्रमाणात मास्कचा काळाबाजार सुरूच होता. लोकमत चमूने याबाबतची ‘रिॲलिटी चेक’ करून ‘एन ९५’ मास्क कुठे १०० तर कुठे १५० रुपयांत मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आणले. ‘एफडीए’ने औषध दुकानांवर कारवाई केली. अखेर काळाबाजाराला वचक बसला.
-असे वाढले रुग्ण
मार्च १६
एप्रिल १३८
मे ५४१
जून१,५०५
जुलै५,३९२
ऑगस्ट २९,५५५
सप्टेंबर७८,०१२
ऑक्टोबर १०२७८६
नोव्हेंबर १११७६५
डिसेंबर १२१३४६(२४ तारखेपर्यंत)
-महिन्यातील मृत्यू
महिना मृत्यू
एप्रिल २
मे ११
जून १५
जुलै९८
ऑगस्ट ९१९
सप्टेंबर १४०६
ऑक्टोबर ९५२
नोव्हेंबर २६९
डिसेंबर २०६(२४ तारखेपर्यंत)