नागपूर : ग्रामीणच्या तुलनेत शहरात कोरोनाचा वेग वाढत असल्याचे चित्र आहे. शनिवारी नागपूर जिल्ह्यात ४८६ कोरोनाबाधितांची नोंद झाली. यात शहरातील ४१६, ग्रामीणमध्ये ६८ तर जिल्हाबाहेरील २ रुग्ण आहेत. रुग्णांची एकूण संख्या १,३८,३०० झाली असून, ५ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ४,२२४ वर गेली आहे. विशेष म्हणजे, बाधितांची संख्या वाढत असताना कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेला फारसे गंभीरतेने घेतले जात नसल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
नागपूर जिल्ह्यात नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात चाचण्यांच्या तुलनेत ३ ते ५ टक्के रुग्ण दिसून यायचे. परंतु फेब्रुवारी महिन्यात यात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: कोरोनाबाबत वाढलेली बेफिकीरी, कमी झालेला मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा व सॅनिटायझरचा कमी झालेल्या वापरामुळे रुग्णात वाढ होऊ लागली आहे. आज ४,१६७ आरटीपीसीआर तर ५५२ रॅपिड अँटिजेन अशा एकूण ४,७१९ चाचण्या झाल्या. या चाचण्यांच्या तुलनेत १० टक्के बाधित रुग्णांची नोंद झाली. आज मृतांमध्ये शहरातील २, ग्रामीणमधील १ तर जिल्हाबाहेरील २ मृत्यू आहेत. सध्या ३,८४९ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. यातील १२०५ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयात तर, २,६४४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
- १,३०,२२७ रुग्णांची कोरोनावर मात
दिलासादायक बाब म्हणजे, शनिवारी २६६ कोरोनाबाधित बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत १,३०,२२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यात शहरातील १,०४,२६३ तर ग्रामीणमधील २५,९६४ रुग्णांचा समावेश आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९४.१६ टक्क्यावर गेला आहे.
- मेयो, मेडिकल व एम्समध्ये वाढले रुग्ण
बाधितांमध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये भरती रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असलेल्या मेयोमध्ये ८०, मेडिकलमध्ये ११२ तर कोविड हेल्थ सेंटरला असलेल्या एम्समध्ये ४५, मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात २०, आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये २३, पाचपावली हॉस्पिटलमध्ये ५ तर उर्वरित रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये भरती आहेत.
- दैनिक चाचण्या : ४,७१९
- बाधित रुग्ण : १,३८,३००
_- बरे झालेले : १,३०,२२७
- उपचार घेत असलेले रुग्ण : ३,८४९
- मृत्यू : ४,२२४