एसीबीची कारवाई : पांढराबोडी चौकीतील घटना नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत दीड हजार रुपयाची लाच घेताना एक लाचखोर पोलीस शिपाई सापडला. बुधवारी दुपारी अंबाझरी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या पांढराबोडी चौकीत ही कारवाई करण्यात आली. पाच दिवसातील ही दुसरी कारवाई असून यामुळे शहर पोलीस विभागात पसरलेला भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. श्रीकृष्ण गोपाल नितवने असे आरोपीचे नाव आहे. तो नायक शिपाई या पदावर कार्यरत आहे. राजू मसराम असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. राजू आॅटोचालक आहे. मंगळवारी राजूला नितवनेने फोन करून त्याच्याविरुद्ध एका महिलेने तक्रार दिल्याचा हवाला देत चौकीत बोलावले. राजू पोलीस चौकीत येऊन नितवने याला भेटला असता त्याने एका महिलेने त्याच्या विरोधात अवैध बांधकाम केल्याची तक्रार केली असल्याची माहिती दिली. तसेच प्रकरण निपटवण्यासाठी दोन हजार रुपये मागितले. परंतु राजूने असमर्थता दर्शविली तेव्हा ५०० रुपये कमी केले. दीड हजार रुपयात सौदा पक्का झाला. राजूने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. एसीबीने प्राथमिक चौकशी केली असता लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्या आधारावर नितवनेला रंगेहात पकडण्याची योजना आखण्यात आली. नितवनेने राजूला पैसे घेऊन पांढराबोडी चौकीत बोलावले. ठरलेल्या योजनेनुसार राजू पैसे घेऊन गेला. त्याच्या हातून पैसे घेताना त्याला एसीबीने पकडले. या कारवाईमुळे पोलीस कर्मचारी हादरले आहेत. ५ फेब्रुवारी रोजी वाहतूक शाखेचा हवालदार संजय शिंदे याला ५०० रुपयाची लाच मागण्याच्या आरोपात पकडण्यात आले होते. ही कारवाई एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक फाल्गन घोडमारे, दिलीप कुंदोजवार, हवालदार लक्ष्मण शिंदे, शंकर कांबळे आणि भानुदास गिते यांनी केली. (प्रतिनिधी)चौकीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्षप्रत्येक ठाण्यात पोलीस चौकी आहे. परंतु या पोलीस चौकीत नेमके काय सुरू आहे, याकडे अधिकाऱ्यांचेही लक्ष नाही. त्यामुळेच चौकीत बिनधास्तपणे लाच स्वीकारली जात असल्याची बाब उघडकीस आली आहे.
शिपायाने घेतली पोलीस चौकीत लाच
By admin | Updated: February 11, 2016 03:21 IST