नागपूर : उपराजधानीत सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे अनेक वस्त्यांमध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले होते. याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचादेखील सूर होता. राज्य शासनाकडून तत्काळ मदत मिळण्याची अपेक्षा होती व त्यानुसार पंचनामेदेखील करण्यात आले. मात्र कोट्यवधींचे नुकसान झाले असताना नागरिकांना केवळ ८५ लाखांची मदत करण्यालाच मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाकडूनच विधानपरिषदेत सोमवारी ही माहिती देण्यात आली.
अमोल मिटकरी, विक्रम काळे, सुधाकर अडबाले, अभिजीत वंजारी व इतर सदस्यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्या लेखी उत्तरात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी लेखी उत्तरात ही बाब स्पष्ट केली आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपुरात अनेक घरांचे तसेच पायाभूत सुविधांचे नुकसान झाले होते. तसेच चार नागरिकांचा बळीदेखील गेला. नागपूर शहरातील नुकसानग्रस्त घरांच्या नुकसानासाठी ३० नोव्हेंबरच्या शासननिर्णयानुसार ८५.४४ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच मृतकांच्या कुटुंबियांना चार-चार लाखांची मदत करण्यात आल्याची माहिती अनिल पाटील यांनी दिली.प्रत्यक्षात नागपुरात आलेल्या पुरामध्ये झोपडपट्ट्या व सखल भागातील हजारो घरांचे नुकसान झालेच होते. मात्र अगदी पॉश वस्त्यांतील घरेदेखील पाण्यात बुडाली होती. अनेक घरांमधील इलेक्ट्रॉनिकचे सामान, फर्निचर यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. काही घरांमधील नुकसानाचा आकडाच लाखोंमध्ये होता. अशा स्थितीत केवळ ८५ लाखांच्या निधी वितरणाचा निर्देश जारी करण्यात आला असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पंचनामे पूर्ण, उर्वरित निधी कधी ?
या नुकसानानंतर प्रशासनातर्फे पंचनामे करण्यात आले होते व त्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी-अधिकारीदेखील कामाला लावण्यात आले होते. पंचनामे पूर्ण झाल्यावरदेखील केवळ ८५ लाखांच्या निधी वितरणाला मान्यता मिळाली आहे. उर्वरित निधीला मंजुरी कधी मिळणार असा प्रश्न निर्माण होत आहे.