बुद्धनगरी सज्ज : देशभरातील बौद्ध भिख्खु सहभागी होणारनागपूर : बुद्ध धम्माच्या प्रचार व प्रसाराचे कार्य करणारे बौद्ध भिख्खू देशभरात पसरलेले आहेत. या बौद्ध भिख्खंूचा एकमेकांशी समन्वय स्थापित व्हावा आणि त्यांच्या विचारांचे आदानप्रदान व्हावे, या उद्देशाने नागपुरात बौद्ध भिख्खूंचे तीन दिवसीय महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात देशभरात पसरलेले शेकडो बौद्ध भिख्खू सहभागी होत आहेत. लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक भय्याजी खैरकर व भदंत प्रज्ञाशील महाथेरो यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अखिल भारतीय भिख्खू महासंघ व लॉर्ड बुद्धा मैत्री संघाच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २६ जानेवारी दरम्यान बुद्धनगरी, वर्धा रोड आसोला येथे या संमेलनचे आयोजन करण्यात आले आहे. २४ जानेवारीला भंडाऱ्याचे खासदार नाना पटोले व हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी भदंत आनंद महाथेरो (दिल्ली) हे राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून गुरू चंद्रमणी यांचे शिष्य व बाबासाहेबांचे गुरुबंधू भदंत ज्ञानेश्वर महाथेरो, भदंत प्रज्ञाशील महाथेरो, संघानुुुशासक भदंत सदानंद महाथेरो, भदंत सत्यानंद महाथेरो हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. संमेलनात लेह, लद्दाख, आसाम, नागालॅन्ड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा आदी राज्यातील बौद्ध भिख्खूंना विशेष निमंत्रित केले आहे. अडीच हजार वर्षापूर्वीपासून चालत आलेल्या बौद्ध धम्माचे पालन करणारे बौद्ध भिख्खू व १९५६ च्या नंतरचे बौद्ध भिख्खूू यांच्यात सांस्कृतिक आदानप्रदान, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची भावी रणनीती तसेच भारतातील बौद्धांच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा केली जाईल. याशिवाय सायंकाळी विनया व विजया जाधव यांचा संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम होईल तर २५ जानेवारीला सायंकाळी तुषार सूर्यवंशी यांचा कीर्तनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. २६ जानेवारीला सकाळी झेंडावंदन होईल तर सायंकाळी राज्यातील सुप्रसिद्ध प्रबोधनकार राहुल अन्वीकर यांच्या संगीतमय कार्यक्रमाने समारोप होणार आहे. (प्रतिनिधी)
बौद्ध भिख्खुंचे महासंमेलन नागपुरात
By admin | Updated: January 23, 2016 03:01 IST