लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गटबाजीच्या राजकारणात अडकलेल्या नागपूर शहर कॉँग्रेसचा वाद दिल्लीत पोहोचला. आता शहराच्यापाठोपाठ जिल्हा काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत याप्रकरणी प्रदेश काँग्रेसने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.नागपूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात ३८१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. ही निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी राजकीय पक्षांची परीक्षा घेणारी ठरणार आहे. त्यापार्श्वभूमीवर तिडके यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी थेट जिल्हाध्यक्षावर हल्लाबोल केल्याने जिल्हा काँग्रेसची वाटचाल शहर काँग्रेसच्या दिशेने तर सुरू नाही ना, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. मुळक अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात तीन ठिकाणी नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. मात्र या ठिकाणी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता त्यांनी तिकीट वाटप केल्याने पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले, असा ठपका ठेवत मुळक यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील किती तालुक्यात पक्ष कार्यकर्त्यांच्या सभा घेतल्या, अशी विचारणाही तिडके यांनी केली आहे. विशेष म्हणजे बाबूराव तिडके यांचे पुत्र प्रसन्न हे मुळक यांच्या सोबत नेहमीच फिरताना दिसतात. त्यामुळे बाबूराव तिडके यांनी घेतलेल्या या भूमिकेबाबत काँग्रेस वर्तुळात चर्चा रंगली आहे.मुळक रामटेकचे स्वयंघोषित उमेदवार कामठी विधानसभेतील पराभवानंतर मुळक यांनी आपला मोर्चा रामटेक मतदारसंघात वळविला. यावरही तिडके यांनी नेम साधला आहे. मुळक यांनी रामटेक विधानसभा क्षेत्रात स्वत:ला पक्षाचे स्वयंघोषित उमेदवार जाहीर केले आहे. त्यांच्या या कार्यपद्धतीवर स्थानिक नेते नाराज असल्याने प्रदेश नेतृत्वाने नागपूर जिल्हा काँग्रेसच्या कार्यपद्धतीची पाहणीकरिता निरीक्षक पाठवावा, अशीही मागणी तिडके यांनी केली आहे.बाबूराव तिडके पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते मला आदरणीय आहेत. त्यांच्या भूमिकेवर प्रतिकिया देण्याइतका मी मोठा नाही. मात्र काही मतभेद असल्यास ते दूर करण्यासाठी मी पुढाकार घेईल. राजेंद्र मुळकअध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी
नागपूर जिल्हा काँग्रेसमध्येही वादाची ठिणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 21:52 IST
गटबाजीच्या राजकारणात अडकलेल्या नागपूर शहर कॉँग्रेसचा वाद दिल्लीत पोहोचला. आता शहराच्यापाठोपाठ जिल्हा काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत याप्रकरणी प्रदेश काँग्रेसने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.
नागपूर जिल्हा काँग्रेसमध्येही वादाची ठिणगी
ठळक मुद्दे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांची मुळक यांच्यावर नाराजी