मुख्य रस्त्याच्या कामाला प्रारंभ, नालेसफाई पूर्ण : इतर समस्या कायमचनागपूर : बेसाप्रमाणेच बेलतरोडी परिसरही नवीन नागपूरच्या रूपाने विकसित आणि विस्तारित होत आहे. मिहानमुळे बेलतरोडीचा परिसर बांधकाम व्यावसायिकांसाठी फायद्याचा ठरला. अनेक ले-आऊटस् पडले आणि लोकांनी या भागात मोठ्या प्रमाणात भूखंड घेऊन घरे बांधली. बिल्डर्सनी विकासाच्या नावाखाली मोठमोठ्या इमारती तयार केल्या. मात्र या भूलथापांमुळे येथे राहायला आलेल्या नागरिकांना फजितीच सहन करावी लागली. रस्ते, पाणी, स्वच्छता अशा मूलभूत सुविधांच्या अभावाने नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून हाल सहन करावे लागत आहेत.लोकमत आपल्या दारीच्या माध्यमातून विकासाच्या दाव्याचे सत्य पडताळण्याचा प्रयत्न आम्ही केला. तेव्हा अनेक समस्यांनी त्रस्त असलेल्या बेलतरोडी परिसरातील नागरिकांनी आपला आक्रोश लोकमतच्या व्यासपीठावर व्यक्त केला होता. मुख्य व अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा, डीपी, रोडवरील जीवघेण्या पुलाची समस्या, कचरा, नालेसफाई, गटरलाईन अशा एक ना अनेक समस्या लोकांनी मांडल्या. लोकमतने या सर्व समस्यांवर प्रकाश टाकला. महिनाभरानंतर या भागाची चाचपणी केली तेव्हा रखडलेली काही कामे सुरू झाल्याचे आढळले. मात्र ही कामे कासवगतीने सुरू असून इतर अनेक समस्या कायम आहेत. पावसाळा काहीच दिवसात सुरू होणार असल्याने समस्या कधी सुटणार, हा प्रश्नच आहे.लोकमतच्या व्यासपीठावर बेलतरोडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या होत्या. रिंगरोडपासून बेलतरोडीपर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुर्दशा झाली असून, सिमेंट रोडचे काम अनेक महिन्यांपासून रखडले असल्याचे नागरिकांनी सांगितले. गिट्टी उखडलेल्या पुलावरून लोकांना दिवस-रात्र ये-जा करावी लागत होती. कैकाडीनगर भागात अर्धवट राहिलेल्या नाल्यावरील जीवघेण्या पुलाची समस्या लोकांनी मांडली. नाल्यात शिडी लावून लोकांना पुलावरून येणे-जाणे करावे लागत होते. हा पूर्ण परिसर टॅँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे जलवाहिनी पोहोचलेली नसलेल्या वस्त्यांतील नागरिकांनी संताप व्यक्त केला. याशिवाय नालेसफाई, कचरा समस्या, गटरलाईन, दुर्गंधी, नाल्याला सुरक्षा भिंत अशा अनेक समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली. नागरिकांचा हा आकांत लोकमतने उजेडात आणला. या समस्या मांडल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग आली काय, याची चाचपणी लोकमतच्या चमूने केली असता रखडलेल्या काही कामांना सुरुवात झाल्याचे आढळून आले. मात्र ही कामे फार थोडी आहेत.(प्रतिनिधी)
बेलतरोडीत रखडलेली विकास कामे सुरू
By admin | Updated: June 16, 2016 03:20 IST