नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा व राज्य अबकारी आयुक्त एस. डी. शिंदे यांना अवमानना नोटीस बजावून १५ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही अधिकारी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही देशी दारूचे दुकान चालवू देत नाहीत, असा आरोप आहे. याप्रकरणी नभकुमार बोस यांनी अवमानना याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याची दिवंगत काकू अनसूया बोस यांच्या नावावर देशी दारूच्या दुकानाचा परवाना होता. नंदनवन येथे त्यांचे दुकान आहे. उच्च न्यायालयाने २५ फेब्रुवारी २०१४ रोजी दिलेल्या आदेशानुसार हे दुकान चालविण्याचा अधिकार आपल्याकडे असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. जिल्हाधिकारी व अबकारी आयुक्तांनी अनसूयाबाईचा दुसरा पुतण्या राजेंद्रनाथ बोस यांची तक्रार ग्राह्य धरुन देशी दारू दुकानाचा परवाना निलंबित केला आहे. उच्च न्यायालयाचा आदेश ३१ मार्च २०१४ पर्यंतच लागू होता असे दोन्ही अधिकारी म्हणत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. वोडिटेल यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांना अवमानना नोटीस
By admin | Updated: May 8, 2015 02:14 IST