मेडिकलला पावणेसात कोटींचा गंडा घालण्याचा कट फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 08:47 PM2020-04-24T20:47:25+5:302020-04-24T20:48:22+5:30

अधिष्ठात्यांच्या बनावट सही आणि शिक्क्याचा वापर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या खात्यातून ६ कोटी ७६ लाख ८४ हजार रुपयांचा बनावट धनादेश वटविण्याचा गुरुवारी प्रयत्न झाला.

The conspiracy foil to withdraw seven and three quarter crores from Medical's account | मेडिकलला पावणेसात कोटींचा गंडा घालण्याचा कट फसला

मेडिकलला पावणेसात कोटींचा गंडा घालण्याचा कट फसला

Next
ठळक मुद्देबनावट धनादेश तयार करून रक्कम ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न : बँक अधिकाऱ्यांची सतर्कता, पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अधिष्ठात्यांच्या बनावट सही आणि शिक्क्याचा वापर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या खात्यातून ६ कोटी ७६ लाख ८४ हजार रुपयांचा बनावट धनादेश वटविण्याचा गुरुवारी प्रयत्न झाला. मोठ्या रकमेचा हा धनादेश पाहून बँक अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखविल्यामुळे आरोपींचा प्रयत्न फसला. याप्रकरणी इमामवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चक्क शासकीय महाविद्यालयालाच पावणेसात कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न झाल्याने शासन प्रशासन स्तरावर प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
गुरुवारी सकाळी ११.३० वाजता एक आरोपी अ‍ॅक्सिस बँकेच्या मेडिकल चौक शाखेत धनादेश क्रमांक १२३३६२ घेऊन आला. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (जुनी राजीव गांधी जीवनदायी योजना) खात्याच्या या धनादेशावर ६ कोटी ७६ लाख ८४ हजार ८५० रुपयांची रक्कम लिहिली होती. त्यावर सेल्फ आरटीजीएस असेही लिहून होते. धनादेश आणणाऱ्या आरोपीने यातील रक्कम सद्गुरु ट्रेडिंग कंपनी आणि एस. डी. मेडिकल इक्विपमेंट सप्लायर यांच्या खात्यात जमा करा, असे बँक अधिकाऱ्याला सांगितले.
प्रचंड मोठ्या रकमेचा धनादेश आणि तो घेऊन येणाऱ्या संबंधित व्यक्तीची लगबग पाहून बँक अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी धनादेशाची बारकाईने तपासणी केली. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला. आमच्याकडून असा कोणताही धनादेश कोणत्याही व्यक्तीला देण्यात आला नाही, असे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांचा संशय अधिक बळावला. त्यांनी धनादेशाची बारकाईने तपासणी केली असता तो बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांना बँकेत बोलवून घेतले. झालेला प्रकार त्यांना सांगण्यात आला. त्याची माहिती अधिष्ठात्यांसह आरोग्य विभागाच्या वरिष्ठांपर्यंत देण्यात आली. दरम्यान, फसवणुकीचा हा गंभीर प्रकार उघड झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. सायंकाळपर्यंत विचारविमर्श केल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकारी नंदिनी इस्तारी नालेवात यांनी इमामवाडा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी लगेच बँकेच्या शाखेत जाऊन धनादेशासह संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली. अधिकाऱ्यांचे बयाण नोंदवून घेतले. बँकेचे सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आले. या फु टेजमध्ये बँकेत धनादेश घेऊन येणाऱ्याने त्याच्या तोंडावर स्कार्फ बांधला आहे. त्यामुळे त्याचा चेहरा अस्पष्ट दिसत आहे. बँकेत बाहेर पडताना तो एकच व्यक्ती दिसत असला तरी आजूबाजूला त्याचे साथीदार दडून असावेत, असा पोलिसांचा संशय आहे. आरोपीचा चेहरा अस्पष्ट दिसत असला तरी आम्ही त्याचा लवकरच छडा लावू, असा विश्वास इमामवाडाचे ठाणेदार मुकुंद साळुंके यांनी लोकमत'शी बोलताना व्यक्त केला.

पुण्याची लिंक
या प्रकरणात प्राथमिक चौकशीत महत्त्वपूर्ण माहिती उघड झाली आहे. आरोपीने ज्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यास स्थानिक अ‍ॅक्सिस बँकेच्या अधिर्का­यांना सांगितले, ती सद्गुरु ट्रेडिंग कंपनी आणि एस. डी. मेडिकल इक्विपमेंट सप्लायर या दोहोंचेही खाते पुण्यात असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यापैकी एक खाते स्टेट बँक ऑफ इंडियाचे असून दुसरे खाते को-ऑपरेटिव्ह बँकेचे आहे. आम्ही या संबंधाने पोलिसांना आवश्यक ती सर्व माहिती दिल्याची मेडिकलचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले. उपरोक्त दोन्ही खातेधारक मेडिकलचे रेग्युलर सप्लायर नसल्याचीही माहिती डॉ. गावंडे यांनी लोकमत'ला दिली.

मोठे रॅकेट असण्याची शक्यता सध्या
कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढला आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील संपूर्ण अधिकारी-कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. कोरोना या एकाच विषयाने संपूर्ण आरोग्य खात्याला गुंतवले आहे. त्यामुळे बनावट धनादेशाची शक्कल यशस्वी होईल आणि पावणे सात कोटी रुपयांची रक्कम सहजपणे हडपू, असा गैरसमज आरोपींचा झाला असावा. त्यातूनच त्यांनी हा धाडसी फसवणुकीचा कट रचला असावा, असा संशय आहे. या कटात धनादेश घेऊन येणारा एकच व्यक्ती दिसत असला तरी बनावट धनादेश निर्माण करण्यापासून तो वटविणे यापर्यंतच्या कामात एक मोठे रॅकेटच गुंतले असावे, असाही संशय आहे. प्राथमिक चौकशीत पुण्याची लिंक हाती लागल्यामुळे पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

Web Title: The conspiracy foil to withdraw seven and three quarter crores from Medical's account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.