रस्त्यावर उतरण्याचा इशारा : हेच का अच्छे दिन?नागपूर : राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात केलेल्या वाढीविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी काँग्रेसने धरणे देत नागरिकांवर लादलेली दरवाढ मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा दिला. सोबत राज्य सरकार महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला. शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात मॉरिस कॉलेज टी पॉर्इंट चौक येथे धरणे देण्यात आले. या वेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पेट्रोल- डिझेल दरवाढीसाठी राज्य सरकारचा निषेध केला.याप्रसंगी अभिजित वंजारी, मुन्ना ओझा, अतुल कोटेचा, नगरसेवक दीपक कापसे, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, गुड्डू तिवारी, सुजाता कोंबाडे, रेखा बाराहाते, नयना झाडे, देवा उसरे, सरस्वती सलामे, शीला मोहोड, अमान खान, अरुण डवरे, निमिषा शिर्के, प्रेरणा कापसे आदी उपस्थित होते. विकास ठाकरे म्हणाले, केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढले म्हणून पेट्रोल, डिझेलची दरवाढ केली जात होती.मात्र, भाजप सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असतानाही दर कमी न करता उलट दरवाढ लादली जात आहे. राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात दोन रुपयांची वाढ करून सामान्य माणसाचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत महागाई कमी करून ‘अच्छे दिन’ येतील असे सांगितले होते. आता दरवाढीचे हेच का अच्छे दिन, असा सवाल त्यांनी केला. राज्य सरकारने ही दरवाढ मागे घेतली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा या वेळी ठाकरे यांनी दिला. अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, रेखा बाराहाते, नितीश ग्वालबंसी, बंटी शेळके, यांनीही दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. आंदोलनात कमलेश समर्थ, दीपक वानखेडे, घनशाम मांगे, हरीश ग्वालबंसी, रमेश घाटोळे, जयंत लुटे, विजय बाभरे, अजय हिवरकर, पंकज थोरात, प्रशांत कापसे, राम कळंबे, अंजूम कय्यूम आदींनी भाग घेतला. संचालन डॉ. गजराज हटेवार यांनी केले. (प्रतिनिधी)
पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचा भडका
By admin | Updated: October 7, 2015 03:46 IST