ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वत:हून आघाडीसाठी पुढाकार घेत काँग्रेस नेत्यांशी शुक्रवारी चर्चा केली. मात्र, दुस-याच दिवशी काँग्रेसने राष्ट्रवादीशी आघाडी करण्यात रस नाही, अशी भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे फक्त सहा नगरसेवक आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमुळे ‘घड्याळा’ची ताकद दिसली आहे. दुसरीकडे शहरात काँग्रेसचे संघटन मजबूत झाले आहे. असे असताना राष्ट्रवादीशी आघाडी करून २५-३० जागा कशासाठी सोडायच्या, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे.
२००७ मध्ये राष्ट्रवादीचे ८ नगरसेवक होते. २०१२ मध्ये ही संख्या ६ वर आली. आघाडी झाली नाही तर किमान दोन-तीन नगरसेवक काँग्रेसमध्ये येतील, असा असा काँग्रेसचा दावा आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीसाठी जागा सोडण्यापेक्षा राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक व गेल्यावेळी दुसºया, तिसºया क्रमांकावर राहिलेले उमेदवार पक्षात घेऊन त्यांना १०-१५ जागांवर उमेदवारी देणे फायद्याचे राहील. त्यामुळे राष्ट्रवादीही संपेल व काँग्रेसही मजबूत होईल. राष्ट्रवादीचे कॅडर व्होट नाही. त्यामुळे आघाडी न झाल्यास काँग्रेसला नुकसान होण्याची शक्यता कमीच आहे, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
याबबात काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, राष्ट्रवादीचे नेते पुढाकार घेत चर्चेसाठी आले. ते त्यांचे सौजन्य आहे. मात्र, चर्चेसाठी आलेल्यांना परत पाठविण्याची आपली संस्कृती नाही. ते चर्चेसाठी आले म्हणून काँग्रेस नेत्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आघाडी करण्याचा कुठलाही शब्द आम्ही राष्ट्रवादीला दिला नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. २६ ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रवादीशी आघाडी न करण्याचा ठराव सर्व पदाधिकाºयांनी हात उंचावून एकमताने मंजूर केला व प्रदेश काँग्रेसकडे पाठविला होता. काँग्रेसचा एकही कार्यकर्ता राष्ट्रवादीशी हात मिळविण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करूनच निर्णय घ्यावा, अशी विनंती आपण प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडे करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचा निकाल २० टक्केच
- महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला १४५ पैकी २९ जागा देण्यात आल्या होत्या. यापैकी राष्ट्रवादीने ६ तर काँग्रेसने लोकमंचला सोबत घेत ४१ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीचा निकाल २० टक्के तर काँग्रेसचा ३३ टक्के लागला. महत्त्वाच्या जागा राष्ट्रवादीसाठी सोडल्या नसत्या तर काँग्रेसला आणखी फायदा झाला असता, असे काँग्रेस नेत्यांचे मत आहे.
राष्ट्रवादीशी आघाडी नाहीच
- आघाडी करताना राष्ट्रवादी निवडून येणाºया जागांची मागणी करते. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा हक्क हिरावला जातो. शिवाय सोडलेल्या जागांवरही राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येत नाहीत. आघाडी झाल्यानंतरही काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात राष्ट्रवादीने उमेदवार उभे केल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपण राष्ट्रवादीशी आघाडी होऊ देणार नाही. कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी आपण शेवटपर्यंत लढू.
- विकास ठाकरे, शहर अध्यक्ष काँग्रेस